कोपरगावला तीन हजार कोटींचा निधी… आशुतोष काळेंनी आकडेवारी डिटेलमध्ये सांगितली..
Ashutosh Kale Exclusive On Letsupp Marathi : ‘माझे वडील अशोकराव काळे आमदार असतानाच विमानतळाचं भूमिपूजन झालं होतं. त्यांनीच लोकांना या विमातळाचं महत्व पटवून दिलं होतं. आता आम्ही या विमातळासाठी नवीन टर्मिनलसाठी निधी मंजूर करून आणला आहे. कोपरगाव शहरात सध्या साडेतीनशे कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. लवकरच शहरातील भुयारी गटार योजनेच्या ३२३ कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं. लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात आमदार काळे यांनी विरोधकांना तीन हजार कोटींच्या निधीचा हिशोबही दिला.
तुमचे विरोधक म्हणतात की तीन हजार कोटींचा आकडा हा हवेतला आहे मग त्यातील वस्तुस्थिती काय आहे ? असा प्रश्न विचारला असता काळे म्हणाले, ‘तीन हजार कोटी हे तर खरंच आहे पण हा आकडा याहीपेक्षा पुढे जाणार आहे. विमानतळाच्या नवीन टर्मिनलला मंजुरी मिळाली त्याचेच पंधराशे कोटी रुपये होणार आहेत.’ टर्मिनल झालं विमानतळ झालं पण त्याचा सर्वसामान्यांना काय फायदा? यावरही काळेंनी सविस्तर उत्तर दिलं.
Video: ‘गणेशचा’ आणि विधानसभेचा काडीचा संबंध नाही… काळेंनी कोल्हेंची हवाच काढली!
‘आजूबाजूच्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. उद्योग व्यवसायाचेही जाळे तयार होईल. काकडी गावात पुर्वी दुष्काळी परिस्थिती होती. विमानतळाची उभारणी झाल्यानंतर तिथल्या लोकांना रोजगार मिळाला. आज प्रत्येक घरासमोर एक-दोन टॅक्सी आहेत. त्यातून रोजगार उपलब्ध होतो. आधी तेथे जमिनीचा भाव पाच हजार रुपये एकर होता. आज तेथील जमिनीचा भाव 80 लाख रुपये एकरपर्यंत गेला आहे. या गोष्टी कशामुळे घडल्या तर तिथे विमानतळ उभे राहिल्यानेच हे शक्य झालं आहे.’
ज्यावेळी स्नेहलता कोल्हे आमदार होत्या त्याचवेळी विमानतळ झालं होतं असं सांगितलं जातं. मग त्याचं क्रेडिट तुम्ही कसं घेता? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर आमदार काळे म्हणाले, माझे वडील अशोकराव काळे ज्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी तेथील लोकांना या विमानतळाचं महत्व पटवून दिलं होतं. त्यानंतर लोकं तयार झाले होते. त्यांच्याच काळात विमानतळाचं भूमिपूजनही झालं होतं. फक्त मागच्या पंचवार्षिक काळात विमानतळाचं काम पूर्ण झालं मुद्दा इतकाच आहे.
हा तर विरोधकांचा पोरकटपणा
या विमानतळासाठी तुम्ही काय केलं? असे विचारल्यानंतर ‘विमानतळाचं आधीचं टर्मिनल लहान आहे. त्यामुळे नवीन टर्मिनल मंजूर करण्यासाठी आम्ही राज्य शासनाकडून निधी मंजूर करून आणला आहे.’ असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. तुमचे विरोधक म्हणतात की तु्म्ही जो तीन हजार कोटींचा आकडा आहे गावकऱ्यांना विचारता की आला का तुमच्या गावात तीस कोटींचा निधी हे कसं काय असा प्रश्न विचारण्यात आला.
आमदार काळे म्हणाले हा विरोधकांचा पोरकटपणा आहे. प्रत्येक गावाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी लागला तो साडेतीन हजार कोटींपेक्षाही जास्त आहे. आजमितीस कोपरगाव शहरातच साडेतीनशे कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. तसेच 323 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार आहे. म्हणजेच सातशे कोटींचा निधी एकट्या कोपरगाव शहरातच खर्च होणार आहे. त्यामुळे विरोधकांचा सध्या फक्त पोरकटपणा सुरू आहे.