अजितदादांच्या विमान अपघातावरून दिल्ली दरबारात खळबळ; रोहित पवार यांची राहुल गांधींसोबत अर्धा तास चर्चा
आमदार रोहित पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली आहे.
Rohit Pawar’s half-hour discussion with Rahul Gandhi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली आहे. या भेटीमुळे या अपघाताच्या तपासाबाबतचा राजकीय आणि सार्वजनिक स्तरावरील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या या भेटीत रोहित पवार यांनी अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबत अर्ध्या तासाहून अधिक काळ राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.
या अपघातासंदर्भात विविध स्रोतांकडून जमा केलेली माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि घटनेनंतर उभे राहिलेले अनेक प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर वाढले. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी लोकसभेत हा मुद्दा प्रभावीपणे मांडावा अशी विनंती रोहित पवार यांनी केली. या भेटीची माहिती रोहित पवार यांनी गुरुवारी सकाळी सोशल मीडियावरील एक्स या माध्यमातून दिली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ह्ये म्हटले की, लोकसभेतील प्रभावी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अपघाताबाबत विविध स्रोतांकडून अत्यंत मेहनतीने गोळा केलेली माहिती राहुल गांधी यांना देण्यात आली असून, जनहिताच्या इतर विषयांप्रमाणेच या प्रकरणालाही लोकसभेत आवाज देऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.
भारतीय टँकरांना होर्मुज मार्ग खुला केल्याचा दावा खोटा; इराणचा खुलासा, इस्रायलविरोधी अट घातल्याची माहिती
दरम्यान, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणात काही बाबी संशयास्पद असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या घटनेची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि संसदेत देखील यावर सखोल चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळवण्यासाठी रोहित पवार यांनी दिल्ली दौऱ्यात इतर विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची देखील भेट घेतली. यामध्ये आमआदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश आहे. या नेत्यांसमोर देखील त्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा मांडत संसदेत या विषयावर आवाज उठवण्याची विनंती केली.
रोहित पवार यांच्या या हालचालींमुळे अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांकडून संसदेत हा मुद्दा उपस्थित झाला, तर या प्रकरणाच्या चौकशीबाबत केंद्र सरकारवर राजकीय दबाव वाढू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
