‘वंचित’ची ‘इंडिया’ आघाडीत एन्ट्री होणार? काँग्रेससमोरच ठाकरेंनी काय ‘ते’ स्पष्टच सांगितले
मुंबई : शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडीची युती यापूर्वीच जाहीर झालेली आहे. आता या ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून विचारावे लागेल, असे म्हणत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी वंचित बहुनज आघाडी ‘इंडिया’मध्ये येणार की नाही याचा फैसला आंबेडकर यांच्याच हातात असल्याचे स्पष्ट केले. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Vanchit Bahujan Aghadi will enter ‘India’ Aghadi uddhav Thackeray clearly his stand)
विरोधी पक्षांची वज्रमूठ ठरलेल्या ‘इंडिया’ आघाडीची उद्या तिसरी परिषद मुंबईत पार पडणार आहे. 26 पक्षांचे 80 नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल हे उपस्थिती दर्शविणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.
१६ ऑक्टोबरपर्यंत कोणतंही राजकीय विधान करणार नाही; बच्चू कडूंनी राजकीय मौन का घेतलं?
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येणार की नाही असा सवाल ठाकरे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला आम्ही जाहीर केलेले आहे. आता या इंडिया आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आहे का? हे आम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून विचारावे लागेल. एकदा एकत्र आल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांची तयारी असेल तर महाविकास आघाडीत आणि इंडियामध्ये तेही येऊ शकतात.
‘आम्ही ठाकरे गटासोबत, पण ‘इंडिया’ आघाडीत नाही’; प्रकाश आंबेडकरांचं विधान
इंडिया आघाडीचे निमंत्रण नाही :
दरम्यान, आम्ही शिवसेनेसोबत आहोत, आम्हाला इंडिया परिषदेचं निमंत्रण का नाही? हे काँग्रेसला विचारा, आम्ही ऑफर दिली पण काँग्रेसच निमंत्रण देत नाही, त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीत नसल्याचं प्रकाश आंबेडकर आज (30 ऑगस्ट) पुण्यात बोलताना म्हणाले होते. त्यावर आता काँग्रेस समोरच ठाकरेंनी हा चेंडू आंबेडकरांच्या कोर्टात ढकलला आहे. तसंच आमची बाजू शिवसेना ठाकरे गट मांडणार असून आमचे वकील उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंनी आमचं म्हणणं इंडियामध्ये मांडावं, आमच्या बाजून शिवसेना उद्धव ठाकरे गट बॅटिंग करणार असल्याचंही आंबेडकरांनी सांगितलं होतं.