विदर्भात काँग्रेसला धक्का! अकोल्यातील ‘हा’ बडा नेता आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत होणार दाखल

Akola News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Akola News) होणार आहेत. त्याआधीच पक्षांतराला वेग आला आहे. महायुतीत इनकमिंग वाढली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar NCP) दोन्ही पक्षात रोजच नवीन चेहरे सामील होत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीत 16 पेक्षा जास्त माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. आताही महाविकास आघाडीतील काँग्रेसला धक्का देणारी आणि राष्ट्रवादीला ताकद देणारी बातमी विदर्भातून आली आहे. अकोला महापालिकेतील काँग्रेसचे (Congress Party) माजी महापौर मदन भरगड आज राष्टवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सध्या महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे आमदार जास्त आहेत. राजकीय ताकदही जास्त आहे. अशा परिस्थितीत भाजपसमोर टिकायचं असेल तर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही याची जाणीव एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना झाली आहे.
त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून पक्षप्रवेशाला आणखी विस्तार देण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटात आता काही खरं नाही. पुढचं राजकारण सुरक्षित करायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्याने रोजच नेतेमंडळी प्रवेश घेत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची गळती सातत्याने वाढत चालली आहे.
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांची काढली कुंडली; वाचा, A टू Z स्टोरी
अकोल्यात काँग्रेसची ताकद घटणार
आताही अकोल्याचे माजी महापौर आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी केली होती. यानंतर मात्र त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले होते.
तसं पाहिलं तर मदन भरगड 1996 ते 2017 अशी 22 वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याआधीची 16 वर्षे म्हणजेच 2001 ते 2016 दरम्यान त्यांच्याकडे अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदही होते. या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता मात्र त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही घडामोड घडत आहे. काँग्रेसला नक्कीच धक्कादायक ठरणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाची ताकद मात्र वाढणार आहे. या पक्ष प्रवेशानंतर अकोल्यात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव