“सिद्धरामय्या योग्यच बोलले, आधी महाराष्ट्रात लक्ष द्या..”. : अशोक चव्हाणांनी शिंदे सरकारला फटकारले!

“सिद्धरामय्या योग्यच बोलले, आधी महाराष्ट्रात लक्ष द्या..”. : अशोक चव्हाणांनी शिंदे सरकारला फटकारले!

Ashok Chavan : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. “राज्याच्या सीमावर्ती भागातील या 865 गावांमध्ये महाराष्ट्राने आरोग्य विमा योजना लागू करण्याचा मुद्दा आपल्या निदर्शनास आला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा करावी, असे निर्देश आरण दिले आहेत, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत.

अशोक चव्हाण यांनी आज अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘कोणतेही राज्य असो त्या राज्य सरकारने आधी राज्यात काय चाललं आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्यातच नागरिकांना अनेक गोष्टींचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आपल्या सीमावर्ती भागात जास्त लक्ष दिलं तर ते जास्त योग्य होईल. महाराष्ट्राच्या सीमाभागातीलच लोकं म्हणतात की आम्हाला तेलंगणात जाऊ द्या, कर्नाटकात जाऊ द्या. याचं कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून ते असं म्हणत आहेत. त्यामुळे मला असे वाटते, की प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या सीमावर्ती भागात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं ते काही चुकीचं नाही.’

सीमाभागातील तुमची ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजना बंद करा! सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राला दरडावले

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील मराठी बांधवांसाठी काही योजना आणल्या जात आहेत. त्यासाठी सरकारी अधिकारी या भागात येऊन योजनांची अंमलबजावणी करतात. यावरून आता कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगला तालुक्यातील एका शाळेच्या उद्घाटनप्रसंगी सिद्धरामय्या यांनी हे वक्तव्य केले.

सिद्धरामय्या म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. महाराष्ट्राने कर्नाटकात हस्तक्षेप करू नये. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील 865 गावांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या सीमेत येऊ नये. यासाठी आमच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारच्या सचिवांशी चर्चा केली आहे.

Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला

महाराष्ट्र-कर्नाटक वाद काय ?

कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणीसह अनेक भागांवर महाराष्ट्राकडून दावा केला जात आहे. कारण, या भागात मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे. ही गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी स्थानिक लोकांकडूनही होत असते. मात्र कर्नाटकचा याला तीव्र विरोध आहे. भाषावर राज्य रचनेच्या आधारानुसार सन 1957 मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये अस्तित्वात आली. यावेळी तब्बल 800 मराठी बहुल गावे कर्नाटकात समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावाद धुमसतो आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube