महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय (Maharashtra Cabinet Expansion) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाराजीची लाट उफाळू लागली आहे. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच हुलकावणी मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आहेत. माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. अशातच शिंदे गटाचे एक माजी मंत्री आणि एक भाजप समर्थक आमदार अधिवेशन सोडून माघारी परतल्याची माहिती हाती आली आहे.
मंत्रिपद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे गटाचे आमदार भोंडेकर यांनी कालच पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पक्षाच्या मेळाव्याला गैरहजर राहून भुजबळांनी नाराज असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. शिंदे गटाचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राजभवनातील शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. आता भाजपातही नाराजीचे वारे वाहू लागले आहेत.
कही खुशी कही गम! भाजपाच्या ‘या’ दोन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट? पडद्यामागं काय ठरलं..
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिपद का दिलं नाही याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आमदार रवी राणा यांच्याबाबतही मोठी बातमी मिळाली आहे. रवी राणा मंत्रिपदासाठी इच्छुक होते. परंतु, त्यांचाही विचार झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या रवी राणा यांनी थेट अमरावती गाठली आहे. अमरावती जिल्ह्यात यंदा भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. सात आमदार असताना एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही. रवी राणा यांचे समर्थक कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. आता या नाराजांकडून काय निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठवाड्यातील सहा आमदारांना लाल दिवा; तीन नव्या चेहऱ्यांचीही मंत्रिमंडळात एन्ट्री
या आमदारांनी घेतली शपथ
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रिपदाची शपथ घेतली.