सुशीलकुमार शिंदेंना भाजपने खरंच ऑफर दिली का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Sushilkumar Shinde : काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा दावा माजी मंत्री शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. शिंदे यांना खरंच भाजपाने पक्षप्रवेशाची ऑफर दिली का, असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर आमचे कौटुंबिक संबंध आहेत. परंतु आम्ही त्यांना आणि आमदार प्रणिती शिंदेंना कोणतीही ऑफर दिलेली नाही. प्रसारमाध्यमांतून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपकडून ,शिंदेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिली नव्हती असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांनीच स्वतः याबाबत खुलासा केला होता. त्यामुळे संभ्रम मिटण्याऐवजी वाढत चालल आहे.
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर; खुद्द शिंदेंनीच केला गौप्यस्फोट
काय म्हणाले होते शिंदे ?
अक्कलकोट येथील बोरोटी येथे आयोजित करण्यात आलेल्या हुरडा पार्टीत शिंदे यांनी हे वक्तव्य केले. भाजपकडून मला आणि प्रणितीताईंना आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे त्यामुळे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही भाजपकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जात आहेत. आता मी 83 वर्षांचा झालो आहे. प्रणिती सुद्धा पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
आज मंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात, शिंदेंची भेट घेणार
दरम्यान, आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा आहे. त्यांच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहेत. आज सायंकाळी दोन्ही नेते सुशीलकुमार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहेत. सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मंत्री पाटील शिंदेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ही भेट प्रथमदर्शनी राजकीय नसली तरी यात काही राजकीय चर्चा होणारच नाही असेही नाही. त्यामुळे या भेटीची मोठी चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
Solapur BJP : सोलापूर भाजपात ‘इनकमिंग’ सुरू; पण काही नाव अजूनही वेटिंगवर