कोणी दिल्या कोट्यवधींच्या ‘देवाभाऊ’ जाहिराती? रोहित पवारांनी उकललं गूढ, मंत्रीच जबाबदार पण…

Rohit Pawar Allegations On Devabhau Advertisements : मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात तंबू ठोकला. त्यानंतर सरकारकडून यशस्वी तोडगा काढण्यात आला. यानंतर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर प्रकाशित झाल्या. मात्र, या जाहिराती निनावी पद्धतीने दिल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
‘देवाभाऊ’ जाहिरातीची गूढ उकलली
जाहिरातींच्या स्रोताविषयी (Devabhau Advertisements) कोणताही उल्लेख न केल्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) या जाहिराती एका मंत्र्याने दिल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा मंत्री भाजपचा (BJP) नाही, तर सरकारच्या मित्रपक्षातील आहे.
एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस… pic.twitter.com/IpLZjm8DUv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2025
जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च
रोहित पवार म्हणाले की, या जाहिरातीसाठी (Devendra Fadanvis) कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र ते कुठून आले, कोणत्या मंत्र्यांनी दिले, या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्ट नाहीत. एकीकडे राज्यात रोज शेतकरी आत्महत्यांचा मोठा आकडा असताना आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित होत असताना, या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची वृत्ती गंभीर आहे.
रोहित पवार यांनी या जाहिरातींवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत:
– निनावी पद्धतीने एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या?
– या जाहिरातीसाठीचे पैसे कुठून आले?
– हा मंत्री कोण?
रोहित पवार यांनी सांगितले की, जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होतील. या प्रकारामुळे जनतेमध्येही अनेक शंका निर्माण होत आहेत. राज्यातील या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातींच्या पद्धतीवर राजकीय वर्तुळात गंभीर चर्चेला सुरुवात झाली आहे.