मोठी बातमी : अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं; विश्वासू साथीदारानं दिलेल्या सल्ल्यानं खळबळ
अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्याचं खापर अजितदादांच्या राष्ट्रवादीवर फोडले जात असून, महायुतीत अजितदादांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं असे विधान अजित पवारांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महायुती फुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी यांनी वरील विधान केले आहे. (Ajit Pawar Should Go With Prakash Ambedkar Says Amol Mitkari)
Amol Mitkari : 2024 ला अजितदादाच; मिटकरींनी बावनकुळेंना सांगितलं गणित
अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न
अजितदादांना महायुतीत एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असून, काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोपही मिटकरी यांनी केला आहे. अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी काहीजण मानसिक खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा विश्वासह मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला
RSS च्या मुखपत्रातूनही अजितदादांवर निशाणा
लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमधून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. ज्यात महाराष्ट्रात काहीच गरज नसताना अजित पवारांनासोबत घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर महायुतीमधील धुसफूस आणखी वाढल्याचे चित्र आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनीही अजित पवार यांना सोबत घेण्याबाबत भाजपने पुन्हा विचार करावा अशी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ऐन विधानपरिषदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकात जवळ आलेल्या असताना विसंवाद वाढला आहे. अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मागे पडले असे आता जाहीरपणे बोलले जात आहे.
संकटातून वाचवण्यासाठी बीडच्या बप्पाचा दादांना फोन; सोनवणेंबाबत मिटकरींचा खळबळजनक दावा
…तर, आम्हालाही वेगळा विचार करावा लागले
अजितदादांवर चहूबाजूंनी होत असलेल्या टीकनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीच्या पराभवाचं कारण अजित पवार असल्याचं महायुतीच्या बैठकीत सांगितलं गेलं. जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी थेट महायुतीत अजितदादांचे खच्चीकरण होत असून, त्यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावे असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तोपर्यंत अजितदादा आणि वंचित एकत्र येणार नाही
मिटकरी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता मिटकरींच्या विधानावर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्रित येण्यासंबंधी अमोल मिटकरींनी विधान केले आहे. पण, सध्या अजित पवार यांचा पक्ष भाजपसोबत युतीमध्ये आहे. या परिस्थितीत वंचित त्यांना सोबत घेण्याचा विचार करू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे भाजपसोबत मैत्री ठेवण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे जोपर्यंत अजित पवार गट भाजपसोबत संबंध तोडत नाही तोपर्यंत मिटकींच्या विधानावर गांभीर्याने विचार करता येणार नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.