राहुल गांधींवर घणाघात अन् नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक,फडणवीसांची मुरबाडमध्ये सभा
Lok sabha Election : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं. तसंच, देशात सध्या महाभारत पाहायला मिळत आहे असं म्हणत कौरव विरुद्ध पांडव अशी ही लढाई आहे असंही ते यावेळी म्हणाले. (Kapil Patil) व्यासपीठावर महायुतीचे कपील पाटील उपस्थित होते.
आम्ही दरवर्षी एक पंतप्रधान निवडू
राहुल गांधी विरुद्ध महायुती अशी ही लढाई असून या इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्ष आहेत. आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की मोदी हेच पंतप्रधान असतील. परंतु, आम्ही विरोधकांना प्रश्न विचारला तुमचा पंतप्रधान कोण असेल? त्यावर बोलताना फडणवीसांनी नाव न घेता राऊतांना टोला लगावला. ते म्हणाले, सकाळी बोलणारे पोपटलाल म्हणाले आमच्याकडे पाच उमेदवार आहेत. आम्ही दरवर्षी एक पंतप्रधान निवडू. मग म्हटलं पहिला कसा निवडाल तर त्याचं उत्तर नव्हतं असं म्हणत फडणवीसांनी हा संगीतखुर्चीचा खेळ आहे अशी टीका केली.
प्रत्येक घटकाचा विचार
आम्ही देशातल्या वेगवेगळ्या घटकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम करतोय. म्हणून आमचे पंतप्रधान विकासपुरुष आहेत अशा शब्दांत फडणवीसांनी मोदींचं कौतूक केलं. देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणाऱ्या माणसाचे नाव आहे नरेंद्र मोदी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. तसंच, राहुल गांधी अशा प्रकारचं नेतृत्व देऊ शकतील का?, असा सवाल फडणवीसांनी या सभेत उपस्थित केला.
आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे
यावेळी बोलताना फडणवीसांनी काही कामांचा दाखला देत मोदींचं कौतूक केलं. मुरबाडला ट्रेन आणलीय आणि या ट्रेंनचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. आमच्यासोबत असणारे पक्ष या ट्रेनचे डब्बे आहेत. दिन दलित दुबळ्यांना, गरजूंना घेऊन सोबत ही ट्रेन सुसाट धावणार आहे. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांकडे डब्बेच नाहीयेत. सगळ्यांना इंजिन बनायचं आहे. उद्धव ठाकरेकडे फक्त आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. राहुल गांधींकडे फक्त सोनिया गांधीसाठी जागा आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.