“वाल्मिक कराडच्या संपत्तीतून अनेक धागेदोरे हाती येणार”, आ. धसांच्या सूचक वक्तव्यानं खळबळ!
Suresh Dhas on Walmik Karad : विशेष तपास पथकाने वाल्मिक कराडची (Walmik Karad) पूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केला आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनीही (Suresh Dhas) यावर सूचक शब्दांत भाष्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा निघाला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमदार धस मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या एसआयटीच्या हालाचालींबद्दल विचारलं असता धस म्हणाले, वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त व्हायलाच हवी. कारण ही जी संपत्ती आहे ती फार लांब जाणार आहे. अनेक धागेदोरे यातून समोर येतील असे सूचक वक्तव्य धस यांनी केले.
आकाचा मुलगाही गोत्यात येणार? सुरेश धसांचा ‘महादेव मुंडे’ खून प्रकरणाला हात..
धस पुढे म्हणाले, या प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे. यातील कुणीही सुटता कामा नये. यात जास्त वेळ लागू नये यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालावा. या लोकांना लवकरात लवकर फाशी दिली तर अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा कुणी करण्याची हिंमत करू नये असा धाक यातून राहिला पाहिजे. या प्रकरणात एसआयटी जो तपास करत आहे तो योग्य दिशेने करत आहे असा मला वाटतं.
एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत तर दुसऱ्या बाजूला आता सुरेश धसही मुंबईत आले आहेत. म्हणजे मराठा नेता मोठा नेमका कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय असे अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले असे विचारले असता धस म्हणाले, मी टॉम अँड जेरी पाहण्याचं सोडून दिलं आहे.
बीडमध्ये आणखीही अशा घटना घडल्या आहेत त्याचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना धस म्हणाले, नक्कीच. आता मी महादेव मुंडेंचं बाहेर काढतोय. संदीप दिघोळेचं काढतोय. तिथं अनेक लोकांचे मर्डर झाले आहेत. त्याचा उल्लेख करणं म्हणजे काय पाप आहे का? यातील बहुतांश मर्डर हे राजकीय मर्डर आहेत, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.
लई धुतल्या तांदुळासारखं आयुष्य जगलोय..सुरेश धसांचं वाल्मिक कराडच्या पत्नीला उत्तर