अदिती तटकरे ज्युनिअर, गोगावलेंनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे; संजय निरुपम यांनी ठणकावलं!

Sanjay Nirupam on Raigad Guardian Minister Post : महायुतीत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) रायगड दौऱ्यावर होते. अमित शाह राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरीही गेले होते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या. यावर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण, रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनाच नियुक्ती मिळाली पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. गोगावले यांच्या तुलनेत अदिती तटकरे खूप ज्युनिअर आहेत, असे निरुपम म्हणाले.
संजय निरुपम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत निरुपम म्हणाले, रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अमित शाह सुनील तटकरे यांच्या घरी गेले होते अशी खोटी बातमी विरोधकांकडून पसरवली जात आहे. पण असं काहीच नाही. अमित शाह त्यांच्याकडे फक्त भोजनासाठी गेले होते.
शरद पवारांना धक्का बडा नेता अजित पवार गटात करणार प्रवेश, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिले संकेत
आम्ही शिवसेनेकडून स्पष्ट करू इच्छितो की रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही आहे. हा वाद मिटवण्याची जबाबदारी भाजपाचे केंद्रीय नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. शिवसेनेला रायगडचे पालकमंत्रिपद हवे आहे. आम्ही यावर ठाम आहोत. चर्चेत ही गोष्ट आम्ही स्पष्ट केली आहे. रायगडचे पालकमंत्रिपद आधी शिवसेनेकडेच होते. सुनील तटकरे यांची मुलगी (अदिती तटकरे) फार ज्युनिअर आहे. त्याचवेळी निर्णय झाला होता की भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद दिलं पाहीजे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीतरी आक्षेप आहे. त्यावर आम्ही चर्चा करू. पण भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.