कोंडी फुटली! जागावाटपाच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीचं ‘वंचित’ला निमंत्रण, पत्रच धाडलं
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाबाबत (Lok Sabha Election 2024) चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करत आहोत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्वाचा घटक असून दिनांक 25 जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावे अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
मा. @Prksh_Ambedkar जी, pic.twitter.com/ID83aSKWDu
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 25, 2024
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाही इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी कोणतेही निमंत्रण मिळाले नसल्याचे प्रकाश आंबेडकर अनेकदा म्हणाले होते. वंचित आघाडीला सोबत घ्यायचं की नाही हाही निर्णय होत नव्हता. त्यामुळे वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत येणार की नाही, असा प्रश्न विचारला जात होता. प्रकाश आंबेडकर यांनीही अनेक वेळा आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रणही प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. मात्र इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसतान या यात्रेत सहभागी होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले होते. वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होणार अशाही चर्चा सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचीही सहमती आहे. मात्र याबाबत निर्णय झालेला नाही.
वंचितशी युती केली तर वाचाल नाही तर जेलमध्ये जाणार; आंबेडकरांचा ‘इंडिया आघाडी’ला रोखठोक इशारा