विधानपरिषदेत ‘मनसे’ ठरणार हुकूमी एक्का? एका मतासाठी मविआ-महायुतीत रस्सीखेच
Maharashtra MLC Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने एक (MLC Elections 2024) जास्तीचा उमेदवार दिल्याने चुरस निर्माण झाली आहे. तसेच क्रॉस व्होटिंगचीही भीती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत एक मत महत्वाचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडूनही बारकाईने मतांची जुळवाजुळव केली जात आहे. मत फुटून क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी आमदारांनी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका मताला कमालीचं महत्व प्राप्त झालं आहे. या एका मतासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांत रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी पाठिंब्यासाठी मनसेशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे.
‘काँग्रेसमध्ये तीन ते चार आमदार डाऊटफूल’ निवडणुकीआधीच स्वपक्षीय आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीतही पाठिंबा मिळावा यासाठी महायुतीने संपर्क साधल्याची माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी (Raju Patil) दिली. महाविकास आघाडीच्या बाजूने मत देणार की महायुतीच्या असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राजू पाटील म्हणाले, पक्षप्रमुख राज ठाकरे सध्या (Raj Thackeray) अमेरिकेत आहेत. त्यांनी अजून मला कोणताही आदेश दिलेला नाही आणि माझं त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालेलं नाही.
विधानपरिषदेच्या या निवडणुकीत एक एक मत महत्वाचं आहे तेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून संपर्क साधण्यात आला होता का, या प्रश्नावर राजू पाटील यांनी हो असे उत्तर दिले. दोन्ही बाजूंनी संपर्क साधण्यात आला होता. महत्वाची निवडणूक असल्याने सर्वजण प्रयत्न करत आहेत. याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील. उद्या दुपारपर्यंत जर राज ठाकरेंचा निरोप आला नाही तर मी स्वतः निर्णय घेईल. माझ्या विवेकबुद्धीला पटेल त्यानुसार मतदानाचा निर्णय घेईल. आमच्या पक्षात तेवढं स्वातंत्र्य नक्कीच आहे, असे आमदार राजू पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
उद्या मतदान, क्रॉस व्होटिंगची भीती; चार पक्षांना धाकधूक, शरद पवार अन् काँग्रेस टेन्शन फ्री!
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले आहे. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती आहे. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले आहे. आता हे आमदार मतदानाच्या वेळीच सभागृहात येतील.