Breaking : आरक्षणासाठी एकीकडे सरकारची तातडीची बैठक; दुसरीकडे आंदोलक थेट लोकलच्या केबिनमध्ये घुसले, अन्…

Maratha reservation CM Fadanvis Meeting : मराठा आंदोलनाच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी (CM Fadanvis) महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाच्या (Manoj Jarange Patil) संदर्भात तोडगा काढण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आझाद मैदानात उपोषण
तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी वेग आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईतील विविध भागात आंदोलकांची उपस्थिती जाणवू लागली आहे.
माझी नैतिक जबाबदारी असल्याने…, आझाद मैदानावरील घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
लोको पायलटच्या केबिनमध्ये
सीएसएमटी रेल्वे स्थानक हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र ठरत असून, तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली. सीएसएमटी स्थानकावर उभ्या असलेल्या लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्ये काही आंदोलक घुसले आणि ‘एक मराठा लाख मराठा’ असे घोषवाक्य असलेले पोस्टर त्यांनी लावले. पोस्टर लावून आंदोलक लगेच बाहेर पडले आणि नंतर लोकल गाडी सुटली.
प्रिया, मला तुझी खुप आठवण येईल… नेहमीच! श्वेता पेंडसेची भावनिक पोस्ट
सुरक्षा वाढली
यापूर्वी आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर ठाण मांडून हलगी-ढोल वादन करत आपला रोष प्रकट केला होता. ‘मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’ या निर्धाराने अनेक तरुण आणि महिला आंदोलनात सहभागी झाले आहेत. स्थानक परिसरात घोषणाबाजी, बॅनर, तसेच मराठा ओळखीचे भगवे गमछे यामुळे वातावरण भारलेले दिसत आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तथापि, आंदोलकांचे लक्ष्य कोणत्याही प्रकारची तोडफोड नसून फक्त सरकारचे लक्ष वेधणे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मुंबईत ठाण मांडले
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून विविध स्तरांवरून पाठिंबा मिळत आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय मिळावा यासाठी आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. मात्र, लोकलच्या केबिनमध्ये घुसण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाला होता. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा आंदोलकांकडून दिला जात आहे.