बेस्टमधील पराभवानंतर राज ठाकरेंची गाडी पुन्हा जुन्या ट्रॅकवर; जुनी ‘ब्लू प्रिंट’ काढत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

Raj Thackeray Press Conference : आज सकाळीच राज्याचं राजकारण ढवळून काढणारी घडामोड घडली. मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. या भेटीत काय राजकीय चर्चा झाला याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेने संयुक्त पॅनल देऊनही पराभव झाला. एकही उमेदवार निवडून आला नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकी आधीच्या या निवडणुकीत ठाकरे ब्रँड पुरता अपयशी ठरला. या पराभवाची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने मुंबईच्या राजकारणात भूकंप झाला आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याचं उत्तर राज ठाकरे यांनी यावेळी दिली.
राज ठाकरे म्हणाले, मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांशी काही विषयांवर चर्चा करतोय. आज शहरं उभी राहताहेत त्यात रिडेव्हलपमेंटची काम होतात. त्यात अनधिकृत कामे होत आहेत. माणसं वाढली, गाड्या वाढल्या, वाहतूक वाढली या सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत. कबूतर, हत्तीत आपण अडकलो. या प्रश्नांकडे कुणाचंच लक्ष नाही. या समस्येवर तोडगा काढला नाही तर पुढे कठीण होईल.
लोढा-बिढासारखी माणसं.. अन् स्वातंत्र्यदिनीच आहारावर गदा; कबुतरखाना ते मांसविक्री, राज ठाकरे कडाडले
नाहीतर शहरं उद्धवस्त होतील
त्या दृष्टीकोनातून एक छोटासा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला. वाहतूक समस्येसंदर्भात काही नमुने मी त्यांना दिले. काही कठोर कारवाई वाहतुकीवर करण्याची आता गरज आहे. फुटपाथसाठी काही रंग असायला हवेत. मैदानांच्या खाली पार्किंगची व्यवस्था हवी. शहरांचा आराखडा करण्याची आज खूप गरज आहे. कारण या समस्या आताच आटोक्यात आणता येईल. या मुद्द्यांवर आमची बैठक झाली. आगामी काळात याचे परिणाम दिसतील असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. वाहतुकीचा विषय सध्या अत्यंत गंभीर आहे. आताच या गोष्टी आटोक्यात आणता येतील. नाहीतर शहरं बरबाद होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.