विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस काम करेल: नाना पटोले

  • Written By: Published:
विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस काम करेल: नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election Result) निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. राज्यातील सर्वच स्तरातील प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला असता हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर निघत आहे. एक्झिट पोलमध्येही भाजपा युती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विजयाची माळ, इतक्या मतांना केला भाजपच्या उमेदवाराचा पराभव… 

टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल, असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले, लोकांशी संवाद साधला, पूर्ण तयारीनिशी निवडणुका लढल्या. राज्यात शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी, सरकारचा भ्रष्टाचार असे मुद्दे असताना केवळ लाडकी बहिण या मुद्द्यावरून एवढा मोठा निकाल कसा लागू शकतो, जनतेचाही या निकालावर विश्वास बसलेला नाही, असे चेन्नीथला म्हणाले.

कोल्हापूरात महायुतीची त्सुनामी, महाविकास आघाडीचा क्लीन स्वीप, ‘हे’ आहे कारण 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अत्यंत कमी मताने विजया झाला तर आठ वेळा विजयी झालेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी आपण घेत आहोत असे सांगून जनतेच्या प्रश्नासाठी व लोकशाहीच्या बचावासाठी काँग्रेस पक्ष यापुढेही अधिक जोमाने काम करत राहिल, असेही चेन्नीथला म्हणाले.

पटोले काय म्हणाले? 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून वरिष्ठ पातळीवर या निकालाचे विश्लेषण केले जाईल. परंतु नव्या सरकारने जनतेल्या दिलेली लाडकी बहिण योजना सुरु ठेवावी, शेतकरी कर्जमाफी, शेतीला २४ तास वीज पुरवठा, सोयाबीनला ६ हजार, कापसाला ९ हजार तर धानाला १ हजार रुपये बोनस, एमएसपीपेक्षा कमी भाव मिळाला तर फरकाची रक्कम देणे, तरुणांना नोकऱ्या, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या आश्वासनांची पूर्तता करावी तसेच महाराष्ट्राची संपत्ती विकण्याचे थांबवून राज्याची तिजोरी चांगली करावी, असे नाना पटोले म्हणाले.

निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. उलट भाजपा युतीचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेलाही जनतेचा प्रतिसाद मिळत नव्हता अशा परिस्थितीत आलेला निकाल अनपेक्षित वाटतो. या पराभवावर चिंतन करु आणि जनतेच्या प्रश्नासाठी काम करत राहू असेही नाना पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube