अजितदादांची साथ सोडत भुजबळ भाजपचा ओबीसी चेहरा होणार? दमानियांनी सांगितला ‘प्लॅन’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी केला आहे. भुजबळ यांना त्यांच्या पक्षाचा ओबीसी समाजाचा चेहरा बनविण्याचा भाजपचा डाव आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘एक्स’वर पोस्ट करुन त्यांनी हा दावा केला आहे. (Social activist Anjali Damania has claimed that NCP (Ajit Pawar) leader and minister Chhagan Bhujbal will join BJP.)
राज्यात मागील दिवसांपासून मराठा समाज विरुद्ध ओबीसी (OBC) असा वाद पाहायला मिळत आहे. मराठा (Maratha) समाज कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करत आहे, मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात प्रवेश करत आहे, असा दावा करत छगन भुजबळ यांंच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला विरोध केला आहे.
‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही, जरांगेची दादागिरी हाणून पाडणार : भुजबळांचा हल्लाबोल
नुकतीच शिंदे सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी म्हणून प्रमामपत्र मिळू शकेल अशी अधिसुचना काढली आहे. त्यानंतर भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. एका बाजूला शिवसेना मराठा समाजाच्या बाजूने उभी राहिल्याचे दिसून येत आहे. तर भाजप नेते ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचे म्हणत आहेत. अशात भुजबळही आपल्या पक्षाविरोधात जाऊन भाजपधार्जिणी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
अशात अंजली दमानिया यांनी भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दमानिया म्हणाल्या, भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठ करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप? असा सवालही त्यांनी केला.
‘जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा’; धमकीच्या फोनवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा
दरम्यान, दमानिया यांचा दावा भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. भुजबळ म्हणाले की, ‘त्यांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. मला कुठल्याही पदाची हौस नाही. अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. असे काही प्रपोजल मला आलेले नाही. तसेच माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही. अजून माझ्या पक्षात कोणी माझ्याविरुद्ध काही बोलत नाही. तसेच अजित पवार देखील मी माझ्या समाजाचे काम करत असल्याने त्याला विरोध करत नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे.