पाचव्या टप्प्यात २२७ कोट्याधीश अन् ३९६ ग्रॅज्यूएट; महिलांचा टक्का मात्र कमीच..
Indian Elections 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. चार टप्प्यातील मतदान पार (Indian Elections 2024) पडले आहे. आता पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफॉर्मने पाचव्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केले आहे. या टप्प्यात एकूण ६९५मेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
पाचव्या टप्प्यात २२७ कोट्याधीश रिंगणात
एडीआरने केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की पाचव्या टप्प्यात एकूण १५९ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर २२७ उमेदवार कोट्याधीश आहेत. ६९५ उमेदवारांपैकी ३३ टक्के म्हणजेच २२७ उमेदवार कोट्याधीश आहेत. एआयएमआयएमच्या चार उमेदवारांपैकी दोन उमेदवार करोडपती आहेत. प्रतिज्ञापत्रात या उमेदवारांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती घोषित केली आहे. पाचव्या टप्प्यातील प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ३.५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन उमेदवारांची सरासरी संपत्ती ५६.६४ कोटी रुपये आहे.
Solapur Loksabha : मतदान झालं! कोण उधळणार गुलाल? उमेदवारांची वाढली धाकधूक
५ कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे ८६ उमेदवार
पाचव्या टप्प्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असणारे ८६ उमेदवार आहेत. २ कोटी ते ५ कोटींपर्यंत संपत्ती असणारे ७३ उमेदवार आहेत. ५० लाख ते २ कोटींपर्यंत संपत्ती असणारे १६२ उमेदवार आहेत. १० लाख ते ५० लाखा दरम्यान संपत्ती असणारे १७५ उमेदवार आहेत तर १० लाखांपेक्षा कमी संपत्ती असणारे १९९ उमेदवार रिंगणात आहेत.
पाचव्या टप्प्यात सर्वाधिक संपत्ती घोषित करणारे उमेदवार अनुराग शर्मा आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील झाशी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शर्मा यांच्याकडे एकूण २१२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांभरे आहेत. महाराष्ट्रातील भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या सांभरे यांनी त्यांच्याकडे एकूण ११६ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
मंत्री पियूष गोयल ११० कोटींचे मालक
तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल आहेत. गोयल उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे एकूण ११० कोटी रुपयांची संपत्ती आहे. एक उमेदवार असाही आहे ज्याने आपली संपत्ती शून्य घोषित केली आहे. तर तीन उमेदवारांनी अनुक्रमे ६७ रुपये, ७०० रुपये आणि ५४२७ रुपये संपत्ती घोषित केली आहे.
३९६ उमेदवार ग्रॅज्यूएट, २६ जण डिप्लोमाधारक
उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दाही नेहमीच चर्चेत असतो. पाचव्या टप्प्यात २९३ उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावी दरम्यान झाले आहे. तर ३९६ उमेदवारांनी त्यांचे शिक्षण पदवी आणि त्यापुढे झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. २६ उमेदवार डिप्लोमा धारक आहेत तर पाच उमेदवार मात्र अडाणी आहेत. उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दाही निवडणुकीत चर्चेत असतो.
पाचव्या टप्प्यात फक्त ८६ महिला उमेदवार
उमेदवारांच्या वयाचा विचार केला तर २०७ उमेदवारांचे वय २५ ते ४० दरम्यान आहे. ३८४ उमेदवारांचे वय ४१ ते ६० च्या दरम्यान आहे. १०३ उमेदवारांचे वय ६१ ते ८० वर्षांच्या दरम्यान आहे. महिला उमेदवारांच्या संख्येचा विचार केला तर पाचव्या टप्प्यात फक्त १२ टक्के म्हणजेच ८२ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म्हणजेच यंदाही महिला उमेदवारांची संख्या कमीच दिसत आहे.