मोठी बातमी! एनडीए आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर; निवडणुकीआधीच घोषणा

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर (Bihar Politics) झाला आहे. याच वर्षात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापू लागले आहेत. महागठबंधन आणि एनडीए आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच सत्ताधारी एनडीएला धक्का बसला आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख (रालोजपा) आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. दरम्यान, पशुपती पारस हे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे काका आहेत. परंतु, काका पुतण्यात राजकीय वाद आहेत. लोकसभा निवडणुकीतही दोघांत धुसफूस दिसली होती. त्यानंतर आता बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच पशुपती पारस यांनी मोठा निर्णय घेत सत्ताधारी एनडीए आघाडीला धक्का दिला आहे.
सन 2014 पासून आम्ही एनडीए सोबत होतो परंतु आता आमच्या पक्षाचा एनडीएशी काहीच संबंध नाही. रालोजपा आता एनडीए आघाडीचा हिस्सा नाही. कारण या आघाडीत आम्हाला सम्मान मिळत नाही, अशी टीका पशुपती पारस यांनी केली. बिहारमधील आताचं सरकार दलितविरोधी आहे.
अर्ज मोदींचा पण, पॉलिटिक्स काका-पुतण्याचं; उमेदवारीच्या गर्दीतला किस्साही खास..
सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. लाच दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही वक्फ संशोधन विधेयकाचाही विरोध करत आहोत. बिहार सरकारच्या दारूबंदी धोरणाचा आम्ही विरोध करत नाही. पण या धोरणाच्या नावाखाली गरीब लोकांना तुरुंगात टाकणं योग्य नाही. सरकारने आतापर्यंत ज्या गरीब लोकांना तुरुंगात टाकलंय त्यांची मुक्तता करावी अशी मागणी पशुपती पारस यांनी केली.
स्व. रामविलास पासवान यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. आमचा पक्ष राज्यातील 243 मतदारसंघांत लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार आहे अशी माहिती माजी मंत्री पारस यांनी दिली.
जो पक्ष आम्हाला निवडणुकीत योग्य सन्मान देईल त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत. याबाबती आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ. कोणत्या आघाडी किंवा पक्षासोबत युती करायची याबाबत अद्याप काहीही निश्चित नाही. मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि रालोजपाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी दिली.
बिहारमध्ये नवी दोस्ती! नितीशकुमारांचं नेतृत्व चिराग पासवानांनाही मान्य; बैठकीत मोठा निर्णय