बिहारमध्ये नवी दोस्ती! नितीशकुमारांचं नेतृत्व चिराग पासवानांनाही मान्य; बैठकीत मोठा निर्णय
Bihar Politics : बिहारमध्ये पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार (Bihar Politics) आहेत. राजकीय पक्षांनी मात्र आतापासूनच तयारी सुरू केली आहे. बिहारी राजकारणात (Bihar Elections) कधी काय होईल सांगता येत नाही. आताही अशीच घटना घडली आहे. मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या (CM Nitish Kumar) जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता (Chirag Paswan) पूर्ण बदलले आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आगामी विधानसभा निवडणूक नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढवू अशी घोषणा केली आहे.
बिहारच्या राजकारणात ही अनोखी घटना घडली आहे. कारण मागील काही वर्षांपासून नितीशकुमार आणि चिराग पासवान यांच्यातील राजकीय शत्रूता मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशात चिराग यांनी वेगळाच निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिराग यांच्यासमोर अशी कोणती समस्या निर्माण झाली की त्यांना नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्याचे जाहीर करावे लागले असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास पासवान) काही दिवसांपूर्वी राज्य संसदीय बोर्डाची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पक्षाने नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्याची (Bihar Assembly Elections 2025) घोषणा केली. राज्यातील सर्व 243 मतदारसंघात तयारी सुरू करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
विधानसभेसाठी चिराग यांचं खास प्लॅनिंग
या बैठकीनंतर लोजपा नेते हुलास पांडे यांनी सांगितले की पार्टी नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करताना पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येईल असेही सांगण्यात आले. या व्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वाचे प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आले. या निर्णयातून असे दिसून येत आहे की केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खास प्लॅनिंग केल्याचे दिसून येत आहे.
नितीश यांच्या सुरात चिराग यांचा सूर
चिराग पासवान नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्यास तयार झाले तरी कसे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. खरं तर एनडीए आघाडीत (NDA Alliance) राहून नितीशकुमार यांच्याशी वैर ठेवणं परवडणार नाही ही गोष्ट चिराग यांच्या लक्षात आली आहे. बिहार राज्याला विशेष दर्जा देण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीला चिराग यांनीही सहमती दर्शवली होती. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाचे चिराग यांनी समर्थन केले होते.
ज्यावेळी भाजप नेते अश्विनी चौबे यांनी बिहार निवडणुका भाजपच्या नेतृत्वात लढण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर जेडीयूने प्रतिक्रिया देत राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढण्यात येतील असे सांगितले होते. यावरही चिराग पासवान यांनी जेडीयूचे समर्थन करत नितीशकुमार यांच्याच नेतृत्वात एनडीए बिहारमध्ये निवडणूक लढवेल असे सांगितले होते. याआधी 2020 मध्ये लोक जनशक्ती पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढली होती. या निवडणुकीत चिराग यांनी नितीशकुमार यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. याचा फटका जेडीयूला (JDU) बसला होता.
आधी चिराग, नंतर त्यागी.. बिहारी राजकारणांतून ‘मित्रां’ना भाजपाचा करेक्ट मेसेज!
चिराग पासवान यांच्यासमोर सध्या पक्षाचा फायदा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. यासाठीच त्यांच्याकडून प्रत्येक डाव टाकला जात आहे. नितीशकुमार यांच्याबरोबर समन्वय साधून विधानसभेत आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने (Lok Sabha Elections) त्यांचे वजन वाढले आहेच. आता विधानसभा निवडणुकीतही ते अशीच कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.