Amazon सारख्या कंपन्या किरकोळ विक्रेत्यांच्या मुळावर.. भाजपाच्या मंत्र्याने पुरावेच दिले
Piyush Goyal on E Commerce Companies : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी (Piyush Goyal) भारतात व्यवसाय करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांना चांगलंच फटकारलं आहे. दिग्गज अमेरिकन कंपनी अॅमेझॉनचं (Amazon) नाव घेत केलेलं वक्तव्याची आता चर्चा सुरू झाली आहे. अॅमेझॉनने भारतात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याच घोषणेवरून मंत्री गोयल यांनी कंपनीला (E Commerce) फटकारे लगावले आहेत. अमेरिकी कंपनी भारतीय अर्थव्यवस्थेची कोणतीही सेवा करत नाही. उलट देशात झालेलं नुकसान भरून काढत आहे. कंपनीला मोठं नुकसान झालं आहे. अत्यंत कमी किंमतीत वस्तुंची विक्रीमुळे ही परिस्थिती कंपनीवर ओढवल्याचे गोयल यांनी सांगितले. कंपनीला तोटा तर झाला आहेच शिवाय ही परिस्थिती भारतासाठीही चांगली नाही कारण यामुळे देशातील कोट्यवधी किरकोळ व्यापाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
ई कॉमर्स कंपन्या उत्पादनांवर भरघोस सूट देऊन देशातील किरकोळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान करत आहेत. या कंपन्या नेमकं काय करतात असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. या कंपन्या उत्पादनांना अतिशय स्वस्त करून टाकतात. मी जर एखाद्या दुकानात जाऊन चॉकलेटचा डबा खरेदी केला तर तो मला 500 रुपयांना पडतो. पण हाच डबा जर मी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला तर तो मला 350 रुपयांनाच मिळेल. असे का तर या वस्तूंवर जास्त मार्जिन असते. याच वस्तू कंपन्या स्वस्त दरात विकून लहान विक्रेत्यांच्या मुख्य उत्पन्नाचं साधनच हिरावून घेत आहेत असा आरोप वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केला.
भारतात रोजगार आणि ग्राहक कल्याणावर ई कॉमर्सचा प्रभाव या विषयावर एक रिपोर्ट जारी केला. यात त्यांनी ई कॉमर्स कंपन्यांच्या व्यापार मॉडेलवर अनेक प्रश्न उपस्थित केले. अॅमेझॉन कंपनी भारतात एक अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा करते त्यावेळी आपण जल्लोष करतो. पण आपण एक गोष्ट विसरतो की अब्जावधींची ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेची सेवा करण्यासाठी नाही. कंपनीला त्या वर्षात एक अब्ज डॉलर्सचा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी ही गुंतवणूक केली जात आहे.
कंपनीला हा तोटा व्यावसायिकांना एक हजार कोटींचे देणे दिल्यामुळे झाला आहे. आता हे व्यावसायिक कोण आहेत याची मला माहिती नाही. पण मला माहिती करून घ्यायला आवडेल की कोणते चार्टर्ड अकांउटेंट, व्यावसायिक किंवा वकील एक हजार कोटी घेतात. एका वर्षात सहा हजार कोटी रुपयांचा तोटा वस्तूंच्या किंमती कमी करण्यावरून लक्षात येत नाही. हा फक्त ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये कंपन्यांना उत्पादने थेट ग्राहकांना विकण्याची परवानगी नाही, असे मंत्री गोयल यावेळी म्हणाले.
Naresh Goyal : उधार पैशांवर उभ्या राहिलेल्या सर्वात मोठ्या एअर कंपनीचे विमान जमिनीवर कसे आले?
कंपन्यांची हातचलाखी उघड
सरकारच्या धोरणानुसार कोणताही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म देशात ग्राहकांना थेट उत्पादने विकू शकत नाही. तरीही या कंपन्या स्वतःला B2B म्हणून दाखवण्यासाठी सर्व व्यवसाय एका संस्थेद्वारे पुनर्निदेशित करतात. कंपन्या असं का करत आहेत ही आपल्यासाठी चिंतेची बाब का नसावी असा सवाल गोयल यांनी उपस्थित केला.
अर्थव्यवस्थेत ई कॉमर्स क्षेत्राची भूमिका आहेच. परंतु, याबद्दल अतिशय काळजीपूर्वक आणि सावधपणे विचार करण्याची गरज आहे. ई कॉमर्स कंपन्या किरकोळ विक्रेत्यांची जास्त किंमत आणि जास्त मार्जिन असणारी उत्पादने काढून टाकत आहेत. देशात रिटेल व्यवसाय वेगाने वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेने या ट्रेंडचे परिणाम पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.