केजरीवालांचा माइंडगेम! संघप्रमुख भागवतांना लिहीलं पत्र; विचारले भाजपविरोधी 4 सवाल
Arvind Kejriwal Letter to Mohan Bhagwat : दिल्ली विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. सत्ताधारी आम आदमी पार्टीने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यातच आता आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत. सध्या भाजप आणि आम आदमी पार्टीत मतदार यादीच्या मुद्द्यावर जोरदार घमासान सुरू आहे. यावरही केजरीवाल यांनी सवाल केले आहेत.
या पत्रात केजरीवाल म्हणतात, भाजपने मागील काही दिवसांत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या त्यांचं समर्थन आरएसएस करतंय का? भाजपाचे नेते उघडपणे पैसे वाटप करत आहेत, पैशांच्या माध्यमातून मते विकत घेण्यास आरएसएस पाठिंबा देतंय का? मतदार यादीत मोठ्या संख्येने पूर्वांचल भागातील नागरिक आणि दलित वर्गातील मतदारांची मते कमी केली जात आहे. लोकशाहीसाठी हे योग्य आहे असं आरएसएसला वाटतंय का?
भारतीय जनता पार्टी लोकतंत्र कमकुवत करत आहे असे आरएसएसला वाटतंय का? असे सवाल केजरीवाल यांनी या पत्रात केले आहेत. विशेष म्हणजे, केजरीवाल यांनी याआधीही मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना प्रश्न विचारले होते. तीन महिन्यांपूर्वी सुद्धा त्यांनी मोहन भागवतांना पत्र लिहीलं होतं. त्यावेळी केजरीवालांनी पाच सवाल केले होते.
ममता बॅनर्जी सर्वात गरीब तर नायडू सर्वात श्रीमंत CM; संपत्तीचे आकडे ऐकून व्हाल थक्क!
केजरीवालांचा भाजपवर घणाघात
मतदार यादीच्या मुद्द्यावर भाजप आणि अरविंद केजरीवाल यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप दिल्लीत मत कापण्याचं काम करत आहे. जे पात्र मतदार आहेत त्यांचीही नावे कमी करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. माझ्या नवी दिल्ली या मतदारसंघात भाजपाचे ऑपरेशन लोटस 15 डिसेंबरपासून सुरू आहे. या पंधरा दिवसांत जवळपास 5 हजार मतं डिलिट करणे आणि साडेसात हजार मतं जोडण्यासाठी अर्ज केले आहेत असे केजरीवाल म्हणाले होते.
AAP Convenor Arvind Kejriwal writes to RSS Chief Mohan Bhagwat
“Whatever wrong BJP has done in the past, does RSS support it? BJP leaders are openly distributing money, does RSS support buying votes? Dalit and Purvanchali votes are being cut on a large scale, does RSS think this… pic.twitter.com/GjGaFfCxeA
— ANI (@ANI) January 1, 2025
भाजपनेही दिलं तिखट उत्तर
यानंतर भाजपनेही केजरीवाल यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, 2014 मध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी दिल्लीतील मतदारांची संख्या 1 कोटी 19 लाख इतकी होती. यानंतर 2015 मधील निवडणुकीत यामध्ये वाढ होऊन ही संख्या 1 कोटी 33 लाख इतकी झाली. वाढलेले 14 लाख लोकांना कोण घेऊन आलं आणि कुठून आणलं याचं उत्तर कुणाकडेच नाही असे सचदेवा म्हणाले.
दरम्यान, दिल्लीतील 70 पैकी 70 विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीने उमेदवारांची घोषणा केली आहे. सीएम आतिशी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे भाजपने अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप केलेली नाही. काँग्रेसनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
राजकारणातील दुर्मिळ घडामोड! प्रियंका गांधींनी केलं अमित शाहांचं कौतुक; आभारही मानले