निवडणुकीआधीच कुस्ती! काँग्रस नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर आप नेत्यांचा संताप; कारवाईची मागणी
Congress vs AAP : राजधानी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. मात्र या निवडणुकीआधीच सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीत आप आहे. लोकसभा निवडणुकीतही दिल्लीत दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढली होती. परंतु, आता मैत्रीची जागा वादाने घेतली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटलं. त्यांच्या या शब्द प्रयोगामुळे आम आदमी पार्टीचे नेते चांगलेच भडकले आहेत. काँग्रेसने माकन यांच्यावर चोवीस तासांच्या आत कारवाई करावी अशी मागणी आप नेत्यांनी केली आहे.
मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ
अजय माकन यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतली. आतिशी म्हणाल्या, काँग्रेसची वक्तव्ये आणि त्यांच्याकडून सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहिल्या तर स्पष्ट होत आहे की काँग्रेसने भाजपाशी साटेलोटे केले आहे. अजय माकन म्हणतात की अरविंद केजरीवाल अँटी नॅशनल आहेत. त्यांनी असा आरोप भाजपाच्या नेत्यांवर कधी केला आहे काय असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते अजय माकन?
काँग्रेस नेते अजय माकन यांनी आपवर जोरदार टीका केली होती. आम आदमी पार्टीबरोबर आघाडी करणं ही काँग्रेसची मोठी चूक होती. यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांना निशाण्यावर घेत बोलण्याच्या ओघात त्यांना चक्क अँटी नॅशनल म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते माकन यांच्यावर तुटून पडले आहेत. आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संजय सिंह म्हणाले, दिल्लीत काँग्रेस पक्ष भाजपाच्या बाजूने उभा राहिला आहे. काँग्रेस सध्या अशीच कामे करत आहे ज्यामुळे भाजपला फायदा होईल. अजय माकन तर भाजपाचीच स्क्रिप्ट वाचत असतात. भाजपने सांगितल्यानंतर ते आम आदमी पार्टीच्या नेत्यांना टार्गेट करतात.
काल तर त्यांनी सर्व मर्यादा तोडल्या. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना थेट अँटी नॅशनल म्हटलं. जर केजरीवाल अँटी नॅशनल असतील तर दिल्लीतल्या लोकांना शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि रोजागाराची व्यवस्था ते कशी करत आहेत असा सवाल संजय सिंह यांनी केला. आता सर्वच मर्यादा पार झाल्या आहेत. अजय माकन यांनी मोठी चूक केली आहे. आता काँग्रेसने २४ तासांच्या आत त्यांच्यावर कारवाई करावी. जर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही अन्य पक्षांना सांगू की काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढा असा इशारा संजय सिंह यांनी दिला आहे.
दिल्लीतही लाडकी बहीण योजना, दरमहा खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे, केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक