Download App

पालकांनो सावधान, मुलांमध्ये वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती..

सिगारेटच्या धुरात असणारे कॅडमियमसारखे जड धातू घरात आणि आसपासच्या वातावरणात ऑटिझम आजाराचे कारण ठरू शकतात.

Autism Risk in Children : सिगारेटच्या धुरात असणारे कॅडमियमसारखे जड धातू घरात आणि आसपासच्या वातावरणात ऑटिझम आजाराचे कारण ठरू शकतात. दिल्लीतील एम्सने केलेल्या एका अभ्यासात ऑटिझमने ग्रस्त असणाऱ्या मुलांमध्ये क्रोमियम, लेड, मर्करी, मँगेनीज, कॉपर, कॅडमियम, आर्सेनिक यांसारखे धातू आढळून आले आहेत. यामुळे जड धातू सुद्धा ऑटिझम वाढण्याला कारणीभूत ठरत आहेत.

हे जड धातू दूषित खाद्य पदार्थ, प्रदूषित हवा, औद्योगिक कचरा, लेड युक्त खेळणी, सिगारेटचा धूर या माध्यमांतून मुलांच्या शरीरात प्रवेश करत आहेत. एम्सचे पेडियाट्रिक न्यूरोलॉजीच्या तज्ञ डॉ. शेफाली गुलाटी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की लहान मुले रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि टिव्ही पाहत असतात. वाढलेला स्क्रीन टाइम सुद्धा (Screen Time) हा आजार वाढण्याचे एक कारण आहे.

निरोगी मुलांत कोणतीच समस्या नाही

ऑटिझमने ग्रस्त असणाऱ्या 3 ते 12 वर्षे वयोगटातील 180 मुले आणि निरोगी 180 मुले अशा दोन गटांत हा अभ्यास करण्यात आला. यात ऑटिझम पीडित 32 टक्के मुलांमध्ये सात प्रकारचे जड धातू जास्त प्रमाणात आढळून आले. निरोगी मुलांत अशी कोणतीच समस्या आढळून आली नाही.

भारतात कॅन्सरपेक्षाही लठ्ठपणा धोकादायक; पण, जगासाठी ‘या’ आजाराची डोकेदुखी, अहवाल उघड

यानंतर एक दुसरा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत ऑटिझम पीडित 500 रुग्ण आणि 60 निरोगी मुलांचे ब्लड सँपल तसेच 250 रुग्ण 30 निरोगी मुलांच्या युरिन सँपलवर अध्ययन केले जात आहे. यामध्ये सुरुवातीच्या निष्कर्षात ऑटिझम पीडित मुलांमध्ये लेड, आर्सेनिक, कॅडमियम, मँगेनीज आणि क्रोमियमची पातळी सामान्य मुलांच्या तुलनेत जास्त आढळून आली.

वाहने आणि इन्व्हर्टरमधील बॅटरी, औद्योगिक संस्था, लेड युक्त खेळण्या लेडचे स्रोत असू शकतात. खराब बॅटरींचे अवैध आणि असुरक्षित पद्धतीने विल्हेवाटी मुळे याचे एक्सपोजर होऊ शकते. एम्समध्ये एक मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

यावेळी चौकशी केली असता डॉक्टरांच्या लक्षात आले की या मुलाचे वडील लेड बॅटरी बनवण्याचे काम करतात. वडिलांच्या कपड्यांच्या माध्यमातून लेड धातू घरात येत होता. मुलाच्या शरीरात लेडची पातळी 90 मायक्रोग्राम प्रति डेसी लिटर आढळून आले. खरंतर या लेडचे प्रमाण 5 मायक्रोग्राम प्रति डेसी लिटर असले पाहिजे. चेलेशन थेरपी उपचाराने हा मुलगा बरा झाला.

मुलांसाठी खेळणी खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जी खेळणी खरेदी करत आहात त्यावर लेड मुक्त लिहिले असल्याची खात्री करून घ्या. पाण्याचे जून पाईप, पेंट आणि माती मध्ये लेड धातूची उपस्थिती सुद्धा याचा स्रोत असू शकतो. सिगारेटच्या धुराच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तीच्या शरीरात कॅडमियम प्रवेश करू शकते. तसेच भूजलामध्ये अनेक प्रकारचे जड धातू असतात. समुद्रातील मासे खाल्ल्याने मर्करी धातू शरीरात प्रवेश करू शकतो.

मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष परवडणार नाही, भारतात समस्या गंभीर; WHO नेही दिला ‘हा’ इशारा

अमेरिकेत ऑटिझम वाढतोय..

मागील अडीच दशकांच्या काळात अमेरिकेत ऑटिझमचा आजार 312 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे अमेरिकेतील प्रत्येक 36 मधील एका मुलाला हा आजार आहे. एम्सद्वारे 2011 मध्ये केलेल्या एका सर्वेनुसार त्यावेळी अमेरिकेत प्रत्येक 89 मुलांमधील एका मुलाला हा आजार होता.

या नंतर या आजाराच्या फैलावाबाबत कोणताही खास अभ्यास झालेला नाही. मात्र लहान मुलांमध्ये हा आजार वाढत चालला आहे एवढे मात्र नक्की. या आजारावर अजून कोणतेही चमत्कारिक औषध नाही. एम्समध्ये केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की ग्लूटेन मुक्त आहार ऑटिझम ग्रस्त मुलांची वर्तणूक, एकाग्रता, झोपेच्या समस्येत सुधारणा घडवून आणतो. याशिवाय प्रोबायोटिकमुळे सुद्धा फायदा होतो.

follow us