शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, एकाच दिवसात 13.4 लाख कोटी बुडाले, चक्क 543 शेअर्सना लोअर सर्किट

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारासह आज संपूर्ण जगातील शेअर बाजारात मोठी (Stock Market Crash) घसरण दिसून आली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहे. अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ (Tariffs) घोषणा आणि याला चीनने (China) दिलेल्या प्रत्युत्तरामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज भारतीय बाजारात सेन्सेक्स 2,226 अंकांनी घसरून बंद झाला तर निफ्टी 22,200 च्या खाली आला. या घसरणीमुळे भारतीय बाजारात आज 13.5 लाख कोटी रुपये बुडाले आहे.
सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीसह (Nifty) आज स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये देखील घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक 3.46 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 4.16 टक्क्यांनी घसरला. तर सर्वात मोठी घसरण धातू, रिअल्टी, आयटी आणि भांडवली वस्तूंच्या शेअर्समध्ये दिसून आली. व्यवहार बंद होताना, बीएसई सेन्सेक्स 2,226.79 अंकांनी किंवा 2.95 टक्क्यांनी घसरून 73,137.90 वर बंद झाला. दुसरीकडे, 50 शेअर्सचा एनएसई निर्देशांक निफ्टी 742.85 अंकांनी किंवा 3.24 टक्क्यांनी घसरून 22,161.60 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे 13.42 लाख कोटी रुपये नुकसान
7 एप्रिल रोजी बीएसईवर लिस्टींग कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 389.92 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे मागील व्यापार दिवशी म्हणजेच शुक्रवार, 4 एप्रिल रोजी 403.34 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे बीएसईवर लिस्टींग कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 13.42 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स लाल रंगात बंद
आज बीएसई सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले सर्व 30 शेअर्स लाल रंगात बंद झाले. सर्वात मोठी घसरण टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये दिसून आली, जी 7.73 टक्क्यांनी घसरून बंद झाली. याशिवाय, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिस हे देखील 3.75 टक्क्यांवरून 5.78 टक्क्यांनी घसरून सर्वाधिक तोट्यात आले.
राम शिंदेंच्या गुगलीवर रोहित पवार क्लीन बोल्ड…, निवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला
3,505 शेअर्स घसरले
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या जास्त होती. आज एक्सचेंजवर एकूण 4,225 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. यापैकी 576 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर 3,505 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 144 शेअर्स कोणत्याही चढ-उतारांशिवाय स्थिर राहिले.