ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ बॉम्बने शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टी कोसळला..

Donald Trump Reciprocal Tariff Impact on Indian Share Market : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ गुरुवारपासून लागू केला आहे. ट्रम्प यांनी या कराला डिस्काउंटेड टॅरिफ असे नाव दिले आहे. यात भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. या निर्णयाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर पडले आहेत. शेअर बाजार आज (Indian Share Market) पुन्हा गडगडला आहे. शेअर बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली. परिणामी बीएसई सेन्सेक्स 805.58 अंकांनी घसरला. एनएसई निफ्टीत 182.05 अंकांची घसरण झाली.
याआधी मंगळवारी (1 एप्रिल) सुद्धा शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. मंगळवारी सेन्सेक्स 1390.41 अंकांनी घसरुन 76,024.51 अंकांवर तर निफ्टी 353.65 अंकांनी घसरुन 23,165.70 अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर आज गुरुवारी सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 3 कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी दिसत होती. 27 कंपन्यांचे शेअर्स मात्र घसरले होते. दुसरीकडे निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 25 कंपन्यांचे शेअर्स सकाळच्या सत्रात तेजीत आहेत. सेन्सेक्स कंपन्यांत सनफार्मा कंपनीचे शेअर्स सर्वाधिक 4.37 टक्क्यांनी वाढले आणि एचसीएल टेकचे शेअर्स 2.32 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
शेअर बाजार गडगडला! एकाच दिवसांत गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात; काय घडलं?
या शेअर्सना बसला फटका
या व्यतिरिक्त आज सेन्सेक्स कंपन्यांत पॉवर ग्रिडचे शेअर्स 1.24 टक्क्यांनी तर एनटीपीसीचे शेअर्स 0.98 टक्क्यांनी वधारले आहेत. इन्फोसिस 2.20 टक्के, टेक महिंद्रा 2.05 टक्के, टिसीएस 1.98 टक्के, झोमॅटो 1.18 टक्के, अदानी पोर्ट्स 1.11 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रिज 0.97 टक्के, टाटा मोटर्स 0.85 टक्के, हिंदु्स्तान युनिलिव्हर 0.75 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 0.75 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.75 टक्के, इंडसइंड बँक 0.74 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.73 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.71 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा काय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) सत्ता हाती घेतल्यापासून जगाच्या डोकेदुखीत वाढ करणारे अनेक निर्णय घेतले आहेत. भारतासह अन्य देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांची ही घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. यामध्ये भारतावर 26 टक्के तर चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे.
ज्याची भीती होती ते घडलंच! भारतावर 26 तर चीनवर 34 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ; ट्रम्प यांचा निर्णय