आयआयटीयन बाबांची महाकुंभातून हकालपट्टी; कोणाकडे असतो कुंभातून बाहेर काढण्याचा अधिकार?
Abhey Singh : प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरू असलेल्या महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह (Abhay Singh) यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, महाकुंभमेळा सुरू होऊन आठवडा होत नाही तोच त्यांची कुंभमेळ्यातून हकालपट्टी झाल्याची माहिती समोर येत आहे. अभय सिंह जुन्या आखाड्यात मडी आश्रमातील (Madi Ashram) शिबिरात राहत होते.
१३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याला लाखो भाविक येत आहेत. या महाकुंभात अनेक बाबांही पोहोचले आहेत. मात्र, मागील काही दिवसांत महाकुंभापेक्षाही सोशल मीडियावर आयआयटीयन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले अभय सिंह यांचीच चर्चा आहे. त्यांच्या मुलाखती एकामागून एक वृत्तवाहिन्यांवर येत आहेत. आयआयटीयन बाबांविषयी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत, तर काही नकारात्मक बोलत आहेत. त्याच्याशिवाय, सर्वात सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हर्षा रिछारिया देखील सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यात. मात्र, आता कुंभमेळ्यातील आखाड्यातून आयआयटीयन बाबांना हाकलून टाकण्यात आल्याची बातमी येत आहे. तर साध्वी हर्षा यांनीही कुंभ सोडल्याची चर्चा आहे.
गुगलचं गणित पक्कं! खास टेक्निकने तयार होतो मॅप; AI चा सपोर्ट मिळतो का? जाणून घ्याच..
जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते श्री महंत नारायण गिरी यांनी सांगितले की, सोशल मीडियावर आयआयटीन बाबांनी त्यांच्या गुरूंविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्यात आली. याशिवाय, निरंजनी आखाड्याशी संबंधित सर्वात सुंदर साध्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षा रिछारिया यांनी कुंभमेळ्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबांना आखाड्यातून कोण बाहेर काढते?
भारतातील आखाडे चालवण्याचा अधिकार अखिल भारतीय आखाडा परिषद आणि स्थानिक प्रशासनाकडे असतो. म्हणजे, ज्या आखाड्यात जो व्यक्ती प्रमुख असतो, त्याच्याकडे त्या आखाड्यासंबंधित निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जुना आखाड्याचे अध्यक्ष महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज आहेत. ते या कुंभमेळ्यात आलेले आहेत. या कुंभात जुन्या आखाड्याीलकोणत्याही साधूने वा बाबाने काही अनुचित वर्तन केलं किंवा वादग्रस्त वक्तव्ये केली तर ते त्या संबंधित साधूला आखाड्यातून बाहेर काढून टाकू शकतात. हा निर्णय सर्वच आखाड्यांना लागू आहे.
मी साधू संत नाही
दरम्यान, कुंभमेळ्यात आयआयटी बाबांची खूप चर्चा सुरू आहे. जुना आखाड्यातून हकालपट्टी झाल्यानंतर ते रात्री गंगेच्या ठिकाणी पूजा आणि ध्यान करताना दिसतो. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी सांगितले की, आपण कुंभमेळ्यात फक्त शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी आलोय. मी कोणत्याही पंथाशी किंवा आखाड्याशी संबंधित नाहीत. ना कोणत्याही महाराजांकडून दीक्षा घेतलेली आहे. मी साधू-संत नाही, मला फक्त आयुष्याचे सत्य जाणून घ्यायचं आहे, म्हणून मी इथं आलोय, असं ते म्हणाले.
दरम्यान, अभय सिंह यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. यानंतर ते कॅनडामध्ये ३६ लाख रुपये वार्षिक पगारावर काम करत होते. पण काही कारणास्तव, भारतात परतल्यानंतर, ते अध्यात्माकडे वळले.