काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?

काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?

Jammu Kashmir Elections : तिहार जेलमध्ये तुरुंगवास भोगत असतानाही लोकसभा निवडणुकीत इंजिनिअर राशीद (Engineer Rashid) विजयी झाला होता. विशेष म्हणजे, राशिदने माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचाच पराभव केला होता. या निवडणुकीची देशभरात चर्चा झाली होती. आता जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या (Jammu Kashmir Elections) निमित्ताने अब्दुल राशिद शेख म्हणजेच इंजिनिअर राशिद चर्चेत आला आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत राशिदचा अवामी इत्तेहाद पक्ष रिंगणात आहे. आता राशिदचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपुल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या पक्षांची समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने राशिदला 10 सप्टेंबरला जामीन दिला होता. 2 ऑक्टोबरपर्यंत जामिनाची मुदत आहे. आता कोर्टाने हा जामीन निवडणूक प्रचारासाठी (Election Campaign) दिला आहे. याआधी 28 ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण होऊन जामिनावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. तुरुंगातून बाहेर येताच राशिदने आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला होता.

काश्मीरचं राजकारण कसं बदलणार

राशिद इंजिनिअर तुरुंगातून बाहेर आल्याने त्याचा काश्मिरच्या राजकारणावर परिणाम होईल असं सांगितलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या  (Lok Sabha Elections) काळात राशिद तुरुंगात होता आणि त्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती. उत्तर काश्मीरात त्याचा चांगला प्रभाव दिसून आला होता. आताच्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलली आहे. राशिदच्या पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. अनेक लोकांनी त्याच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता प्रश्न हा आहे की तुरुंगात असतानाही राशिद इंजिनिअरला विजय कसा मिळाला.

Jammu and Kashmir Assembly Election : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर

या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर लक्षात येतं की जम्मू काश्मीरसाठी लोकसभा निवडणुका काहीशा वेगळ्या होत्या. दीर्घकाळानंतर लोकांना मतदान करता आलं. भाजपवरील राग म्हणून लोक एनसी किंवा पीडीपीला प्राधान्य देतील असं वाटलं होतं. परंतु, राशिदचा नवा पर्याय त्यांच्यासमोर होता. जम्मू काश्मिरात जोरात प्रचार सुरू आहे. या प्रचारातच एनसी आणि पीडीपीने राशिदवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप लावला आहे. काश्मिरमधील मतांचं विभाजन करण्याचा त्यांचा एकमात्र अजेंडा आहे असे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राशिदसाठी जसं वातावरण दिसून आलं तीच परिस्थिती आताही आहे असे राशिदच्या मुलाने सांगितले. उत्तर काश्मीरच नाही तर सेंट्रल काश्मीर, दक्षिण काश्मीरमध्येही युवकांमध्ये असेच वातावरण दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर काश्मीरमधील युवकांनी राशिदच्या प्रचारात भाग घेतला होता असे अबरार राशिदने सांगितले.

Jammu Kashmir Election : गणित सुटलं; नॅशनल कॉन्फरन्सला 51, काँग्रेसला 32 जागा, तर 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत

जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर निवडणूक लढेल. काँग्रेसला 32 जागा देण्यात आल्या आहेत. तर, दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा माकपला तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. पाच जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

जम्मू काश्मिरात तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube