उत्तर ते दक्षिण, 230 जागा अन् स्वबळावरील 8 पक्ष; भाजप-काँग्रेसची वाढलीय ‘धाकधूक’

उत्तर ते दक्षिण, 230 जागा अन् स्वबळावरील 8 पक्ष; भाजप-काँग्रेसची वाढलीय ‘धाकधूक’

Lok Sabha Elections 2024  : देशात भाजप आणि काँग्रेस दोन मोठे पक्ष आहेत. आगामी निवडणुकीसाठी दोघांनीही आपापल्या आघाड्या तयार केल्या आहेत. राजकारण सेट करण्यासाठी आणि निवडणूक सोपी करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनाही सोबत घेतलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी नव्याने (INDIA Alliance) उदयास आली आहे. तर भाजप नेतृत्वाने आधीच्याच एनडीए आघाडीला ताकद देण्याचं काम सुरू केलं आहे. या आघाड्यांमध्ये अनेक पक्षांनी एन्ट्री घेतली आहे. या पक्षांना काही जागा देण्यातही येतील. पण, जरा थांबा या आघाडीबाहेरही काही पक्ष आहेत ज्यांच्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोघांचंही गणित नक्कीच बिघडू शकतं.

लोकसभेच्या रणांगणात या पक्षांनी स्वतःच्या ताकदीवर उडी घेतली आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. या पक्षांनी आव्हान दिल्याने काँग्रेस भाजपाचा खेळ नक्कीच बिघडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कारण, देशभरातील 230 मतदारसंघात या पक्षांचा चांगलाच प्रभाव आहे.

भारतीय जनता पार्टी 40 पक्षांसह आणि काँग्रेस 27 पक्षांसह लोकसभा निवडणुकीत आमनेसामने आहेत. पण देशभरात 8 पक्ष असे आहेत ज्यांच्यामुळे भाजप आणि काँग्रेस दोघांचीही राजकीय गणिते बिघडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आता या आठ राजकीय पक्षांनी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना टक्कर देण्याचा प्लॅन आखला आहे. या पक्षांनी जर निवडणुकीत चांगली कामगिरी केली तर काँग्रेस आणि भाजप दोघांचाही मतांचं गणित डळमळू शकतं. या गोष्टीची जाणीव इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीएला सुद्धा आहे. त्यामुळे या आठ पक्षांचा प्रभाव असलेल्या भागात वेगळी रणनीती आखली जात आहे.

देवेगौडांचं कुटुंब पक्कं राजकारणी! मुले अन् जावई लोकसभेच्या रिंगणात; भाजपशीही दोस्ती

उमेदवारांची निवड करताना या पक्षांच्या व्होटबँकेचा प्राधान्याने विचार केला जात आहे. तसेच मोठे नेते प्रचारात या पक्षांवर थेट हल्ले करणे टाळत आहेत. या पक्षांच्या व्होट बँकेचा विचार केला तर देशभरात हे प्रमाण 15 टक्क्यांच्या आसपास आहे. तरीसुद्धा देशात असे 230 मतदारसंघ असे आहेत जिथे या पक्षांचा दबदबा आहे. या मतदारसंघातील लढती तिरंगी करण्याची क्षमता या पक्षांमध्ये निश्चितच आहे. देशातील हे राजकीय पक्ष कोणते आहेत आणि प्रमुख पक्षांचं राजकारण कसं डेमेज करू शकतात याची माहिती घेऊ या..

तामिळनाडूत भारतीय अन्ना द्रविड मुनेत्र कडगम एक मोठा पक्ष आहे. सध्या हा पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. तामिळनडूमधील 39 आणि शेजारील पुदुच्चेरी मधील 1 अशा 40 लोकसभा मतदारसंघात पक्षाचा प्रभाव आहे. मागील निवडणुकीत एआयएडीएमके भाजपबरोबर होता. मात्र नंतर पक्षाने भाजप बरोबरी युती तोडली. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा होत्या पण या चर्चा फेटाळून लावत एआयएडीएमकेने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. दुसरीकडे तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके काँग्रेसबरोबर आहे. आता निवडणुकीत कुणाला आघाडी मिळेल याचं उत्तर एआयएडीएमकेच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.

वायएसआर काँग्रेस

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे. या राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. या राज्यात लोकसभेचे एकूण 25 मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत पक्षाने एकहाती विजय मिळवला होता यंदा मात्र तशी परिस्थिती नाही. निवडणूक अवघड राहणार आहे. कारण एका बाजूला बीजेपी टीडीपी युती आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस जोरदार आहे. त्यामुळे आंध्रात लोकसभेचा पेपर कसा असेल याचं उत्तर वायएसआर काँग्रेसची कामगिरी देणार आहे.

वंचित बहुजन आघाडी

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीला एकूण 6.92 टक्के मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी अनेक बैठका झाल्या पण ठोस निर्णय झाला नाही. यानंतर आघाडीने अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. राज्यातील 12 मतदारसंघांवर वंचितचा थेट प्रभाव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.

Congress Manifesto : महिलांना वार्षिक 1 लाख, 30 लाख नोकऱ्या; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

बहुजन समाज पार्टी

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील 84 जागांवर बसपा बळकट स्थितीत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपा आघाडी होती. परंतु यंदा पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे. सन 2014 मध्ये बसपाने स्वबळावर लढत देत 70 जागांवर समाजवादी पार्टीला जोरदार झटका दिला होता. समाजवादी पार्टीने यंदा काँग्रेसबरोबर आघाडीत आहे. मात्र पश्चिम युपी आणि बुंदेलखंड भागात बसपामुळे टेन्शन वाढले आहे. फक्त समाजवादी पक्षच नाही तर भाजप विरोधातही बसपाने एकास एक उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाची लढाई यंदा भाजपसाठीही सोपी नाही. मध्य प्रदेशाचा विचार केला तर येथील ग्वालियर आणि चंबळ प्रांतात बसपा मजबूत आहे. जर मध्य प्रदेशात हत्तीने जोरदार कामगिरी केली तर काँग्रेसचा खेळ बिघडू शकतो.

भारत राष्ट्र समिती

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बीआरएसच्या देश विस्ताराच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. या पराभावातून सावरत पक्षाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत. यापैकी 9 जागा भारत राष्ट्र समितीने जिंकल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा विचार केला तर 2019 नंतर दोन्ही पक्ष राज्यात अधिक चांगल्या स्थितीत आले आहेत. तरीही बीआरएस अनेक मतदारसंघात डोकेदुखी ठरू शकते. तेलंगणातील शहरी भागात अजूनही केसीआर यांच्या पक्षाचा दबदबा आहे.

तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे. राज्यात लोकसभेच्या 42 जागा आहेत. मागील काही वर्षांत भाजप या राज्यात शक्तिशाली झाला आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना मागे टाकत प्रमुख विरोधी पक्षाची जागा भाजपने घेतली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारली होती. तब्बल 18 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली होती. इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चा सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली. आता ममता यांनी राज्यात भाजप आणि काँग्रेस दोघांविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

इनेलो आणि जजपा

हरियाणात मुख्य लढत इंडिया आघाडी आणि भाजप यांच्यातच आहे. पण राज्याच्या राजकारणात इनेलो (इंडियन नॅशनल लोकदल) आणि जजपासारख्या प्रादेशिक पक्षांवर सुद्धा नजर आहे. हे दोन्ही पक्ष यंदा स्वबळावर निवडणूक लढत आहेत. राज्यात लोकसभेच्या 10 जागा आहेत. या सगळ्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला हिसार मतदारसंघातून विजयी झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube