Manipur Violence : हिंसेची धग कायम! बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात पिता-पुत्र ठार; तणाव वाढला
Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Manipur Violence) नाही. मागील 24 तासांत राज्यात चार वेगवेगळ्या हिंसाचाराच्या घटनांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पिता आणि पुत्राचाही समावेश आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील निंगथौखोंग खो खुनौ येथे काल दुपारी अनोळखी बंदूकधाऱ्यांनी पिता पुत्राची गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारात आणखी एक ठार झाला. मयत व्यक्ती सर्व निंगथौखोंग खो कुनौ येथील रहिवासी होत्या.
इंफाळ जिल्ह्यातील कांगचूप येथे मैतेई समुदायातील तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्यातील या हिंसक घटनांत म्यानमारमधील उग्रवाद्यांचा सहभाग असण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. तसे जर असेल राज्य आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.
Manipur Violence: हिंसेची धग कायम! आई-पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून प्रसिद्ध गायकाचं अपहरण
मागील दोन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारा दोन पोलीस कमांडोंसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षातील मे महिन्यात हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून राज्य हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 180 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत.
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. राज्यात दररोज कोणत्या ना कोणत्या घटना घडत आहेत. तेथे मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. कुकी समाजाप्रमाणे मणिपूर राज्यातही एसटीचा दर्जा मिळावा, अशी मेईती समाजाची इच्छा आहे. आता या प्रकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. मेईतेईच्या या मागणीनंतर कुकी समाज त्याच्यावर चांगलाच संतापला असून, त्यावरून जोरदार वाद सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी तेथे महिलांच्या शोषणाचे प्रकरणही समोर आले होते, ज्याची बरीच चर्चा झाली होती आणि त्यावरून बराच वादही झाला होता.