Lok Sabha 2024 : उत्तरेत भाजप, दक्षिणेत विरोधक स्ट्राँग; ‘दक्षिण दिग्विजय’ भाजपसाठी यंदाही कठीणच
Lok Sabha Election 2024 : उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेखही उंचावलेला. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर शोधूनही सापडत नाही. तामिळनाडू या द्रविड भूमीत तर भाजप औषधालाही नाही. केरळात डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मजबूत आहे तर तेलंगाणात भाजपाचा नंबर तिसरा आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असल्याने येथील वाटचालही भाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. एकूणच काय तर आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारताचा किल्ला भेदणे भाजपासाठी अवघड कोटीतील गोष्ट ठरणार आहे. या चारही राज्यात भाजपाची काय स्थिती आहे? पक्षासमोर काय अडचणी आहेत? विरोधकांची ताकद किती आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या..
उत्तर भारतात जरी भाजप विरोधी पक्षांवर वरचढ दिसत असला तरी दक्षिणेचा किल्ला भेदणे आजही अवघड आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. पण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू मध्ये भाजपला खातेही उघडता आले नव्हते. पुद्दुचेरीतील एक जागाही हातची गेली होती. दक्षिणेत कर्नाटकचा अपवाद वगळता दक्षिणेतील बाकीच्या राज्यांत भाजपाचे पाटी कोरीच राहिली आहे. दक्षिण भारतातील राज्यांत लोकसभेच्या एकूण 132 जागा येतात.
Lok Sabha Elections : अरुणाचलात काँग्रेसला धक्का! आमदारांच्या हाती भाजपाचा झेंडा
कर्नाटकात सिद्धरामय्या-शिवकुमार जोडीचे आव्हान
मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या. आता या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा अशी कामगिरी करता येणे अवघड दिसत आहे. परंतु, राज्यात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. त्यामुळे ही जमेची बाजू म्हणता येईल. भाजपाने जेडीएसला सोबत घेतले आहे. तर माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष बनवून येथील राजकारण काही प्रमाणात सेट केले आहे. भाजपला आता काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकु्मार या जोडीच्या रणनीतीला आव्हान द्यायचे आहे.
आंध्रात भाजपाची द्विधी मनस्थिती
दक्षिणेतील आणखी दोन राज्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. या दोन्ही राज्यात भाजपला शिरकाव करता आलेला नाही. येथे स्थानिक पक्षांच्या कुबड्या घेऊन भाजपाला वाटचाल करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीआधी आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टी आणि तामिळनाडूनत एआयएडीएमके या पक्षांनी भाजपाची साथ सोडली. आता तेलुगू देसम पक्ष पुन्हा भाजपसोबत येण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू राजधानी दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटी घेत आहेत. परंतु, येथे भाजपाची कोंडी झाली आहे. कारण, भाजपने केंद्रात जे मोठे निर्णय घेतले त्या निर्णयांना आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींना सोडून नायडूंशी हातमिळवणी करणे भाजपला शक्य होत नाही.
मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?
तामिळनाडूत भाजपाची पाटी कोरीच
तामिळनाडूत मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-द्रमुक आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या. तामिळनाडूत भाजप सध्या एकाकी आहे. एआयएडीएमके आता सोबत नाही. तमिळ काशी संगम, सौराष्ट्र तमिळ संगमम आणि सेंगोल नवीन संसदेत स्थापन करून भाजपने तामिळी जनतेला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई राज्यातील 236 विधानसभा मतदारसंघात दौरे करून जनाधार भाजपाच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु, या द्रविड भूमीत भाजप कितपत यशस्वी होऊ शकतो याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळेल.
केरळमध्ये डाव्या पक्षांचा किल्ला अभेद्य
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व पहिल्यापेक्षा अधिक जाणवते. परंतु, त्याचा फायदा भाजपाला होताना दिसत नाही. राज्यात भाजपला अजूनही खाते उघडता आलेले नाही. येथे काही नवीन प्रयोग भाजपकडून केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा केरळचा दौरा करून मंदिरांना भेटी दिल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी संरक्षणमंत्री एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांना पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
कर्नाटक गमावलं, तेलंगणाने नाकारलं;’दक्षिण दिग्विजय’ मोहीम अजूनही भाजपच्या टप्प्याबाहेरच
तेलंगणात भाजपाचा नंबर तिसरा
तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत नुकतेच सत्तांतर झाले आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला सत्तेतून बेदखल केले. राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपने चार जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवत भाजपला तिसऱ्या नंबरवर ढकलले. आता लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस चांगली टक्कर देऊ शकते. अशा परिस्थितीत 2019 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपला कठीण होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.