कधीकाळी होता दबदबा पण, मोदी युगात उतरती कळा; प्रादेशिक पक्षांचं ‘पॉलिटिक्स’ बिघडलं
Lok Sabha Elections 2024 : मागील दहा वर्षांपासून केंद्राच्या सत्तेत भाजप आहे. आता तिसऱ्या टर्मसाठी भाजप मोठ्या ताकदीने लोकसभेच्या रणांगणात उतरला आहे. यंदा भाजपसमोर विरोधकांच्या इंडिया आघाडीने आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपनेही आपल्या जुन्या एनडीए आघाडीला नव्याने धार दिली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात दुरावलेले मित्र पुन्हा जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कर्नाटकात जेडीएस, बिहारमध्ये जेडीयू, आंध्र प्रदेशात टीडीपी पुन्हा भाजपसोबत आले आहेत. विरोधी पक्षांची एकजूट काही प्रमाणात दिसत आहे. पण, मागील दहा वर्षांच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर चित्र थोडसं वेगळं दिसतं. भाजप सत्ताधीश होण्याआधी प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व होतं. परंतु, आता हे वर्चस्व मोडीत निघालं आहे. काही राज्यांत तर हेच प्रादेशिक पक्ष आता औषधालाही सापडत नाहीत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर मनमोहन सिंह यांनी देशाचा कारभार आपल्या हाती घेतला. सन २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वात केंद्रात यूपीए सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष सहभागी झाले होते. यानंतर बरोबर दहा वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर देशात मोदी युगाचा प्रारंभ झाला अन् अनेक प्रादेशिक पक्षांचे राजकारणच धोक्यात आले. हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये या काळात प्रादेशिक पक्ष कसे कमकुवत होत गेले याचा आढावा घेऊ या..
भाजपनं 35 वर्षांपूर्वी सोडला होता कोकणचा नाद… आता ‘राणेंना’ कमळ फुलवायला जमणार का?
उत्तर प्रदेशात बसपा बेदखल, ‘सपा’तही वजाबाकी
लोकसभा जागांच्या दृष्टीने उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य. या एकाच राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यामुळे देशभरातील निवडणुकांवर याचा परिणाम होतो. या राज्यात २००४ आणि २००९ या काळात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या प्रादेशिक पक्षांचा चांगला दबदबा होता. पण आजच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्ष दोन आकडी खासदार संख्या सुद्धा गाठू शकत नाहीत इतके कमकुवत झाले आहेत. २००४ मध्ये उत्तर प्रदेशात सपा मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 36 तर बसपाला 19 जागांवर विजय मिळाला होता. यानंतर पाच वर्षानंतर सपा 23 आणि बसपाला 21 जागांवर विजय मिळाला.
देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र या पक्षांचे वजाबाकीचे राजकारण सुरू झाले. 2014 मध्ये तर बसपा उत्तर प्रदेशच्या राजकारणातून जवळजवळ बेदखल झाला. तर समाजवादी पार्टीला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला. 2019 च्या निवडणुकीत बसपाला 10 जागा जिंकण्यात यश मिळाले तर समाजवादी पार्टीने फक्त 5 जागा जिंकल्या.
बिहारमध्ये यादवांच्या ‘राजद’ला सुरुंग
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील राज्य असलेल्या बिहारमध्ये 2004 च्या निवडणुकीत भाजपला 5 आणि नितीशकुमार यांच्या जेडीयूला सहा जागा जिंकता आल्या होत्या. पुढील निवडणुकीत मात्र जेडीयूने शानदार कामगिरी करत 20 जागा पटकावल्या. 2004 मधील निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला 22 आणि एलजेपी पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या. यानंतर पुढील लोकसभा निवडणुकीत मात्र राजदची चांगलीच पिछेहाट झाली. पक्षाला फक्त चार जागा जिंकता आल्या. तर एलजेपीला खाते सुद्धा उघडता आले नाही.
सन 2014 लोकसभा निवडणुकीत भाजप जेडीयू आघाडी नव्हती. या निवडणुकीत जेडीयूला फक्त दोन जागा मिळाल्या. विरोधी राजद चार जागा जिंकण्यात यशस्वी ठरला. तर दुसरीकडे एलजेपीने अनपेक्षित कामगिरी करत सहा जागा जिंकल्या. 2019 च्या निवडणुका भाजप आणि जेडीयूने एकत्रित लढल्या. या आघाडीचा भरपूर फायदा जेडीयूला मिळाला. पक्षाला थेट 16 जागा जिंकता आल्या. राजद मात्र बिहारच्या राजकीय नकाशावरूनच गायब झाला.
मोदी-शाहंची सभा, चव्हाणांना बदनामीची भीती… नांदेड भाजपला जड का जातंय?
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट
लोकसभा जागांच्याबाबतीत देशात दुसरे मोठे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या राज्यात मागील निवडणुकीपर्यंत भाजप शिवसेना एकत्रित लढले. 2004 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या. शिवसेनेला 12 जागा मिळाल्या होत्या. यानंतरच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी 9 जागा जिंकण्यात यशस्वी राहिली. शिवसेनेला मात्र एका जागेचे नुकसान झाले. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेचा आलेख उंचावत राहिला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस 2014 मध्ये सहा आणि 2019 मध्ये फक्त पाच जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. काँग्रेसला तर याहीपेक्षा मोठे नुकसान सहन करावे लागले.
तामिळनाडूत द्रविड पॉलिटिक्स पॉवरफूल
दक्षिण भारताचा विचार केला तर येथे भाजपला अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. भाजपाच काँग्रेसही येथे अपयशी ठरली आहे. या राज्यांतील प्रादेशिक पक्षांभोवतीच येथील राजकारण फिरते. उत्तर भारतातील प्रादेशिक पक्षांचे पडझड येथे दिसत नाही. तामिळनाडू हा या राजकारणाला मोठा अपवाद म्हणता येईल. येथे फाईट द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांतच होते. सध्याच्या राजकारणात AIADMK येथे अस्तित्वहीन दिसत आहे. 2004 मधील निवडणुकीत द्रमुकने 16 जागा जिंकल्या होत्या तर AIADMK ला खाते सुद्धा उघडता आले नव्हते. यानंतर 2009 निवडणुकीत DMK 17, AIADMK 9 जागा जिंकण्यात यशस्वी राहिले. 2014 चा निवडणुकीत मात्र द्रमुकने शानदार कामगिरी करत थेट 37 जागा जिंकल्या तर 2019 निवडणुकीत 24 जागा जिंकल्या.
EVM-VVPAT : निवडणूक प्रकियेत पावित्र्य राखा, व्हेरिफिकेशचा तपशील देण्याचेही ECI ला निर्देश
बंगालमध्ये तृणमूलला भाजपाचे तगडे आव्हान
सलग तीन दशके पश्चिम बंगालमध्ये असलेली डाव्या पक्षांची सत्ता ममता बॅनर्जी यांनी उलथून टाकली. त्यांनतर राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. या राज्यात भाजपला कधीच शिरकाव करता आला नव्हता. मात्र मागील काही वर्षांत या राज्यात भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. 2004 मधील निवडणुकीत डाव्या पक्षांनी राज्यातील 42 पैकी 35 जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला फक्त एक जागा मिळाली. यानंतर 2009 मधील निवडणुकीत मात्र टीएमसीने डाव्या पक्षांना धक्का देत 19 जागा जिंकल्या. यानंतरच्या निवडणुकीत अशीच कामगिरी करत तब्बल 34 जागा जिंकल्या.
पुढे मात्र राज्याच्या राजकारणात भाजपने एन्ट्री घेतली. 2019 च्या निवडणुकीत भाजपने तब्बल 18 खासदार निवडून आणले. या निवडणुकीत टीएमसीची कामगिरी खालावली तरी सुद्धा राज्यात एक नंबरचा पक्ष राहिला. आताही लोकसभा निवडणुकीत भाजप टीएमसीला जोरदार आव्हान देत आहे. याआधी 2021 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने राज्यात प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेतली आहे.