अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना ‘शिशमहल’वर किती झाला खर्च?, धक्कादायक माहिती समोर

Arvind Kejriwal Shishmahal Inquiry : दिल्लीमध्ये सत्तेच्या पटावरून आम आदमी पक्षाला बाजूला करत विजय मिळवलेल्या भाजपने आता आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना थेट टार्गेट करण्यासं सुरू केलय. (Shishmahal ) केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर झालेल्या खर्चाच्या चौकशीचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच या बंगल्यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केला होता.
केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना फ्लॅगस्टाफ मार्गावरील सरकारी निवासस्थानी राहत होते. सुमारे आठ एकर जागेवर असलेल्या या बंगल्याच्या पुनर्निर्माणावर झालेल्या उधळपट्टीची चौकशी करण्याचे मागणी भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी केली होती. त्यानुसार दक्षता आयोगाने या बंगल्यासाठी झालेल्या खर्चाच्या विस्तृत चौकशीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
‘शीशमहल’चे पुनर्निर्माण करताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा तसेच जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचा आरोप गुप्ता यांनी केला होता. बंगल्याच्या जागेचा विस्तार करताना मालमत्तांचे बेकायदा एकत्रीकरण केल्याचेही गुप्ता यांचे म्हणणे होते. आजच्या घडामोडींवर ‘आप’कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
संबंधित बंगल्यात अरविंद हे मुख्यमंत्री म्हणून २०१५ पासून ते मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत रहात होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तसेच संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘शीशमहल’वरील खर्चाचा मुद्दा उपस्थित केला होता. काही लोकांचे लक्ष स्टायलिश शॉवरवर असते, तर आमचे लक्ष सर्वांना राहण्यासाठी घर मिळावे, यावर असते, असा टोला मोदींनी लोकसभेत केजरीवाल यांना उद्देशून मारला होता.
विजेंद्र गुप्ता यांचे आरोप
दिल्लीतील रोहिणी भागातील आमदार असलेले विजेंद्र गुप्ता यांनी मागील वर्षी १४ ऑक्टोबरला दक्षता आयोगाकडे ‘शीशमहल’वरील खर्चाबद्दल तक्रार केली होती. केजरीवाल यांनी बांधकाम खात्याचे नियम धाब्यावर बसवत सरकारी बंगल्याचे रूपांतर आठ एकरवरील भव्य महालात केले आहे, असा दावा गुप्ता यांनी केला आहे. बंगल्याचा विस्तार करण्यासाठी राजपूर रस्त्यावरील प्लॉट क्रमांक ४५ व ४७ आणि फ्लॅगस्टाफ रस्त्यावरील दोन बंगले पाडून सर्व भाग एकाच कुंपणात आणला गेला.
मोकळ्या जागेवरील बांधकामाचे प्रमाण, मान्यताप्राप्त आराखडा या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले. विस्तार आणि सुशोभिकरणासाठी जनतेच्या पैशांचा गैरवापर करत अवाढव्य खर्च करण्यात आला, असेही गुप्ता यांनी दक्षता आयोगाकडे केलेल्या दुसऱ्या तक्रारीत म्हटले होते. दक्षता आयोगाने बांधकाम विभागाकडून अहवाल मागवत अवाजवी खर्च झाल्याची पुष्टीही केली होती.
केजरीवाल यांचे ‘शीशमहल’
तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणापोटी ३३ कोटी रुपये खर्च केल्याचे ‘सीएजी’ने म्हटले आहे.मात्र त्यासाठी प्रस्तावित खर्च ७.९ कोटी रुपये होता. बंगल्याचे नूतनीकरण २०२० मध्ये सुरू झाले होते. अहवालानुसार, ८८ ओएलव्हीईडी टीव्ही (८ के एलजी) बसविण्यात आले आणि त्याची २८.९ लाख रुपयांत खरेदी करण्यात आली. अन्य १० ओएलईडी टीव्ही (फोर के सोनी) वर ४३.९ लाख रुपये खर्च केले गेले. १.८ लाख रुपयाचे एक मायक्रोवेव्ह बसविले होते. दोन स्टिम ओव्हन असून त्याची किंमत साडेसहा लाख रुपये आहे. १.९ लाख रुपयाची वॉशिंग मशिनही खरेदी करण्यात आली होती. दहा बेड आणि सोफ्यावर तब्बल तेरा लाख रुपये खर्च केले गेले.
कशावर किती खर्च? (लाखामध्ये)
टिव्ही संच – ७७ लाख
रेशमी गालिचा – ५० लाख
पितळी कठडे – ४२
स्पा – २०
गरम पाण्यासाठी यंत्रणा – १८
कमोड – १२