देशभरात ‘त्या’ क्रूर खटल्याची चर्चा! कॉन्स्टेबल रेवतीच्या हिमतीला यश, वाचा, अंगावर काटा आणणारी काहाणी
ही घटना उघडकीस येताच तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.
तमिळनाडूच्या साथनकुलम इथल्या पोलीस (Police) कोठडीतील पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सीबीआयच्या तपास अहवालाच्या आधारे न्यायालयाने नऊ पोलिसांनी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान दुकान उघडल्यामुळे पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांना रात्रभर कोठडीत निर्घृणपणे मारहाण केली, ज्यामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाला, असा आरोप आहे.
या प्रकरणात रेवती नावाच्या एका महिला कॉन्स्टेबलने दाखवलेल्या शौर्यामुळे नऊ पोलिसांना त्यांच्या क्रूरतेची शिक्षा मिळाली. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेली रेवतीची मोठी चर्चा आहे. ही घटना तुतीकुडी जिल्ह्यातील सत्तनकुलम पोलीस ठाण्यात घडली. घटनेच्या वेळी रेवती तिथेच कार्यरत होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ती ड्युटीवर आली. त्या दिवशी पोलीस ठाण्यातील वातावरण तिला नेहमीपेक्षा वेगळंच वाटत होतं. लॉकअपमधून तिला किंकाळ्यांचे आवाज, माफीची याचना करणारे आवाज तिला ऐकू येत होते.
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन, न्यायालयाने सुनावली 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशी; नेमकं प्रकरण काय?
साहेब.. कृपया मला जाऊ द्या. मला मारू नका. मला खूप दुखतंय. माझ्याकडून चूक झाली. मी दुकान उघडणार नाही.. अशी विनवणी करणारा आवाज रेवतीच्या कानात घुमत होता. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलीस ठाण्यात इतकी जबर मारहाण करण्यात आली, की ते पुन्हा जिवंत उठलेच नाहीत. जून 2020 मध्ये करोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी दुकानंही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तमिळनाडूतील साथनकुलम इथले व्यापारी पी. जयराज (वय 62) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (वय 31) यांना रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा आरोप करत अटक करण्यात आली.
ही घटना उघडकीस येताच तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. 24 जून 2020 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली होती. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचं म्हणत न्यायालयाने थेट हा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश दिला. याप्रकरणी जेव्हा न्यायिक दंडाधिकारी एम. एस. भारतीदासन हे तपासासाठी साथनकुलम पोलीस ठाण्यात आले, तेव्हा रेवतीने त्यांना त्या रात्री पोलीस कोठडीत काय काय घडलं, त्याची संपूर्ण माहिती सांगितली. पण त्याचबरोबर तिने त्यांच्याकडून एक वचनही घेतलं.
साहेब, तुम्हाला या प्रकरणाबद्दल जी माहिती हवी, ती प्रत्येक माहिती मी देईन, पण त्याआधी तुम्ही माझ्या पतीच्या, दोन मुलींच्या आणि माझ्या नोकरीच्या सुरक्षेची हमी दिली पाहिजे, अशी मागणी तिने केली. दंडाधिकाऱ्यांनीही तिला तसं आश्वासन दिलं, त्यानंतर रेवतीने एकामागून एक त्या नऊ पोलिसांची काळी गुपितं उघड केली. रेवती ज्यांच्याविरुद्ध साक्ष देत होती, ते पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी होते. तरीही तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. न्यायिक दंडाधिकारी एम. एस. भारतीदासन यांनी रेवतीला या प्रकरणात सरकारी साक्षीदार म्हणून नियुक्त केलं होतं.
बाप-लेकाला पोलीस कोठडीत रात्रभर कसं निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, लॉकअपमधून त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, त्यांचं शरीर रक्ताने माखलेलं होतं, त्यांना बुटांनी चिरडलं जात होतं आणि हा छळ एक मिनिटासाठीही थांबला नाही, असा धक्कादायक खुलासा रेवतीने तिच्या साक्षीत केला. दोघंही पिता-पुत्र मदतीसाठी याचना करत होते. आई.. खूप दुखतंय.. मला कृपया जाऊ द्या, अशी विनवणी ते करत होते. हे दृश्य इतकं भयानक होतं की मी स्वत:ला क्षणभर सावरू शकली नव्हती आणि थोड्या वेळाने पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली, असं रेवतीने सांगितलं. आरोपी पोलीस अधूनमधून दारू पिण्यासाठी थांबत होते असा थक्कादायक खुलासाही रेवतीने केला.
पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक बालकृष्णन यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज स्पष्टपणे रेवतीला ऐकू येत होता. पोलिसांनी पिता-पुत्राला इतकी जबर मारहाण केली होती की, ते दोघं रक्ताने माखलेले होते. अशा परिस्थितीतही पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाने त्यांना जमिनीवरील रक्त स्वच्छ करायला लावलं होतं. यादरम्यान जेव्हा रेवतीने जखमी पी. जयराजसाठी पाणी मागितलं, तेव्हा अधिकाऱ्यांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दोघांचे हात बांधले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हे दृश्य सहन न झाल्यामुळे पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्याचं रेवतीने स्पष्ट केलं.