इंडिया आघाडीला पहिला धक्का! ममता बॅनर्जींची ‘एकला चलो’ची घोषणा, बंगालमध्ये स्वबळावर लढणार
Mamata Banerjee West Bengal Lok Sabha Election : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) ऐन निवडणुकीच्या आघाडीवर जबरदस्त झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जागावाटपाच्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा करून इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
बसपाच्या ‘हत्तीची’ लोकसभेच्या पटावर स्वबळाची चाल; ‘इंडिया’ आघाडी चेकमेट?
या घडामोडींनंतर ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आम्ही जागावाटपाचा जो प्रस्ताव दिला होता तो काँग्रेसने नाकारला. त्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आता आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने राज्यातील एकूण जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसा प्रस्तावही काँग्रेसला देण्यात आला होता. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली होती अशी माहिती तृणमूल काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) बंगालमधील भारत न्याय यात्रेबाबत काँग्रेसने (Bharat Jodo Nyay Yatra) काहीच माहिती दिली नाही. आम्ही बंगालमध्ये यात्रा काढणार आहोत अशी माहिती औपचारिकता म्हणूनही काँग्रेसला देता आली असती परंतु त्यांनी तसे केले नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. या यात्रेत तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.
बिहारपाठोपाठ आंध्र-प्रदेशचाही मोठा निर्णय : लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘मास्टर स्ट्रोक’
राहुल गांधी सध्या आसाममध्ये आहेत. यानंतर त्यांची यात्रा पश्चिम बंगाल राज्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही तृणमूलवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेस फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. काँग्रेसच्याच कृपेने 2011 मध्ये ममता बॅनर्जी बंगालच्या सत्तेत आल्या होत्या, अशी टीका चौधरी यांनी केली.
‘डावे’ ‘इंडिया’त आले अन् ममता बाहेर पडल्या
याआधी रविवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात कोलकाता शहरात एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत त्यांनी काँग्रेसवर टीका करत डाव्या पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. डावे पक्ष आघाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी यावेळी केला होता. ज्या लोकांबरोबर मी 34 वर्षे संघर्ष केला त्यांच्या आघाडीतील प्रवेशाला मी सहमती देऊ शकत नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते.