नवनीत राणा, बळवंत वानखडे की दिनेश बूब… बच्चू कडू कोणत्या ‘भिडू’ला संसदेत पाठवणार?

नवनीत राणा, बळवंत वानखडे की दिनेश बूब… बच्चू कडू कोणत्या ‘भिडू’ला संसदेत पाठवणार?

अपना भिडू, बच्चू कडू… असं म्हणतं कायमच आपला आब राखून असलेले नेते अशी बच्चू भाऊंची ओळख. यंदाही लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या राजकारणात तेच केंद्रस्थानी आहेत. सुरुवातील भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल असे चित्र होते. पण बच्चू भाऊंनी ऐनवेळी दिनेश बूब यांना रिंगणात उतरवलं. त्यामुळे लढत तिरंगी झाली. या लढतीत भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि तरुणाईमध्ये नवनीत राणांची असलेली क्रेझ यावर मतं मिळविण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने दलित, मुस्लीम आणि कुणबी मतांची मोट बांधण्यासाठी धडपड केली. याच प्रयत्नात आणि धडपडीत दिनेश बूब यांना किती मते मिळणार हा सध्या अमरावतीच्या राजकीय चर्चेतला हॉट टॉपिक बनला आहे. यातही मेळघाट, दर्यापूर, तिवसा आणि अचलपूर इथे झालेले मतदानही निर्णायक ठरणार आहे. पाहूया अमरावीतमध्ये नेमके काय वातावरण आहे…

नवनीत राणा यांनी गत तीन वर्षांपूर्वीच हिंदुत्वाचा झेंडा उंचावत आपली दिशा स्पष्ट केली होती. त्यामुळे नवनीत राणा याच भाजपच्या उमेदवार असतील हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे त्या उमेदवार झाल्याही. राणा आणि एकूणच भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बराच भर दिला. याशिवाय तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये असलेली क्रेझ यावरही राणांनी मतदान खेचण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी हजेरी लावली. यातून त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. स्वतः राणा, रवी राणा, अनिल बोंडे, प्रवीण पोटे पाटील यांनी राणांसाठी प्रचार यंत्रणा राबवली.

Pune Car Accident : सुरेंद्र अग्रवालांसाठी जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने दिली पोलीस कोठडी

यंदा काँग्रेसने ही जागा हट्टाने उद्धव ठाकरे यांच्याकडून मागून घेतली. बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली. त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये असलेला वावर, शेतकऱ्यांशी असलेली नाळ याचा फायदा होईल असा कयास काँग्रेसने लावला. बळवंत वानखडे यांच्यासाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांच्या सभा झाल्या. याशिवाय आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके यांनीही त्यांच काम केलं. बबलू देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनीही वानखडेंसाठी कष्ट घेतले. अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपच्या आक्रमक प्रचार यंत्रणेपुढेही अगदी पारंपारिक पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली. शेवटच्या दिवसापर्यंत मतदारसंघातील दलित, कुणबी आणि मुस्लीम मतांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु होती.

मतदारसंघात सुरुवातीला नवनीत राणा आणि बळवंत वानखेडे अशी थेट लढत होईल असे चित्र होते. पण अखेरच्या क्षणी बच्चू कडू यांनी या निवडणुकीत खरी रंगत आणली. राणा दाम्पत्याला धडा शिकवायचा प्रहारने लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तयारी करणाऱ्या दिनेश बूब यांना उमेदवारी दिली. बच्चू भाऊंनी त्यांच्या स्टाईलने प्रचार यंत्रणा राबवली. भाजपला अंगावर घेत नवनीत राणा यांच्याविरोधात टीकेचा रोख ठेवला. त्यामुळे भाजपकडे जाणारी मते वळल्याची चर्चा आहे. पण राणा आणि वानखडे यांच्याऐवजी दिनेश बूब यांच्यारुपाने मतदारानां पर्याय मिळाला. त्यामुळे काँग्रेसचीही काही मते विभागली गेल्याचे सांगितले जाते. सायन्सस्कोर मैदानावर झालेल्या वादानंतरही बच्चू भाऊंनी चांगली सहानुभूती मिळवली होती. या सगळ्यामुळे ही मते नेमकी कोणत्या भिडूला आमदार करणार याचे उत्तर चार जूनला कळून येईल.

कुठे किती झाले मतदान?

2019 मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आल्या होत्या. त्यावेळी आघाडीच्या नेत्यांनी अमरावती, तिवसा आणि दर्यापूर या मतदारसंघांमध्ये राणांना घसघशीत आघाडी मिळवून दिली होती. या तिन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. इथे मतदानही चांगले झाले आहे. अमरावती 57.51 टक्के, तिवसा 64.14 टक्के, दर्यापूर 66.88 टक्के असे मतदान झाले आहे. त्यामुळे यंदा या तीनही मतदारसंघांमधून आघाडी मिळवताना राणांना अडचण येऊ शकते. अचलपूरमध्ये 68.84 टक्के मतदान झाले असले तरीही इथून दिनेश बूब पुढे, दोन नंबरला बळवंत वानखडे राहण्याची शक्यता आहे.

गतवेळी मेळघाटमध्येही राणांना 11 हजारांची आघाडी मिळाली होती. यंदा मेळघाटमध्ये प्रहारचे अर्थात बच्चू कडू यांच्या पक्षाचे आमदार आहेत. उमेदवार दिनेश बूब हेही मेळघाट भागातीलच आहेत. त्यामुळे इथली यंत्रणाबूब यांच्यासाठी नवीन नाही. यंदा मेळघाटमध्येच सर्वात जास्त म्हणजे 79.55 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान आता नेमके कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा वाढलेला टक्का मतदारसंघात परिवर्तन घडवणार अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Naveen Patnaik : राजकारणाने बदलला पोशाख, जीन्स घालणारे ‘पटनायक’ बनले खादीधारी

नवनीत राणा यांचे टेन्शन वाढण्याचे आणकी एक कारण म्हणजे बडनेरा मतदारसंघात झालेले कमी मतदान. अमरावती लोकसभेतील सहापैकी बडनेरा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 55.78 टक्के मतदानाची नोंद झाली. हाच मतदारसंघ रवी राणा यांचा बालेकिल्ला समजला जातो. इथून ते मागच्या तीन टर्मपासून आमदार आहेत. गतवेळीही नवनीत राणांना इथून आघाडी मिळाली नव्हती. यंदा इतर मतदारसंघांमधील परिस्थिती पाहता बडनेरामधून आघाडी मिळविण्याचा राणांचा प्रयत्न होता. मात्र मतदानच कमी झाल्याने त्यांच्या या प्रयत्नाना सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

राणांना भाजप नेत्यांनी मदत केली का?

भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा छुपा विरोध ही राणा यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरली. राणा दाम्पत्यांनी मागच्या पाच वर्षांच्या काळात अमरावतीतील महायुतीतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांसोबत वाकडे घेतले. भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार प्रविण पोटे पाटील आणि राणा दम्पत्याचे फारसे जमत नाही. प्रवीण पोटे अमरावतीचे पालकमंत्री असताना रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात खटके उडाले होते. राणा यांनी पाटील यांना अर्वाच्य भाषा वापरली होती. पोटेंना बालकमंत्री असेही संबोधले होते.

श्रीकांत भारतीय यांचे बंधू आणि भाजप नेते तुषार भारतीय यांचाही राणांच्या उमदेवारीला विरोध केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुषार भारतीय आणि रवी राणा यांच्यात वाद झाला होता. शिवसेना नेते आनंदराव अडसूळही राणांच्या प्रचारात दिसले नाहीत. हे जुने वाद आणि वैर यामुळे भाजप नेत्यांनी नवनीत राणांना कितपत मदत केली असावी याविषयी शंका आहेत. मतदान केंद्रांबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अल्प उपस्थितिचीही चर्चा रंगली.

वंचितमधील फूट कॉंग्रेसच्या पथ्यावर :

सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत उमेदवार जाहीर केला होता. पण आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. वंचित आणि एमआयएमनेही त्यांना पाठिंबा दिला. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रचारात सहभागही घेतला. वंचित बहुजन आघाडीत पडलेली ही फूट काँग्रेसच्या पथ्यावरच पडणार असं राजकीय जाणकार सांगतात.

आनंदराज आंबेडकर कोणाची मते खातात?

अमरावती लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, आदिवासी, कुणबी अशा सर्व समाजातील मतदार आहेत. इथे खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. पण इथली दलितांची संख्या आणि रा.सु. गवई यांची पुण्याई लक्षात घेता आनंदराज आंबेडकर हे कोणाची मते खातात, त्यावर इथला खासदार ठरणार असं राजकीय विश्लेषक सांगतात. गतवेळी वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांनी 67 हजार मते घेतली होती. तर आनंदराव अडसूळ यांचा अवघ्या 36 हजार मतांनी पराभव झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज