भाजपचे माजी मंत्री राष्ट्रवादीच्या गळाला; राजकुमार बडोलेंच्या हाती ‘घड्याळ’
Rajkumar Badole News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकमेकांसमोर ठाक उभी आहे. अशातच भाजपचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आलीयं. भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले (Rajkumar Badole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत हातात घड्याळ बांधलंय. राजकुमार बडोले यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
माजी मंत्री मा.श्री. राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम प्रदेश कार्यालयात पार पडला. राजकुमार बडोलेंसारखा एक अनुभवी आणि जनसामान्यांसाठी आवाज उठवणारा नेता पक्षात सामील झाल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचं मी… pic.twitter.com/bL6Ld7zF9P
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 22, 2024
बडोले अर्जुनी मोरगाव मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर दोनवेळा विधानसभेवर गेले होते. महायुतीत या जागेवर राष्ट्रवादीचे आमदार होते. या मतदारसंघाची जागा भाजपला सुटणार असल्याची अपेक्षा बडोले यांना होती. बडोले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं बडोलेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. अखेर राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा खरी ठरली असून बडोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलायं.
सावधान! ऑफीसमध्ये उभे राहून काम करताय? मग, जाणून घ्या काय होतात साइड इफेक्ट्स..
दरम्यान, राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलायं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात निवडून येण्यासाठी तिन्ही पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षांच्या संमतीने जे जे काही शक्य असेल ते करण्यासाठी आमची बोलणी सुरू आहेत. आम्ही सरकारमध्ये केलेली कामे, जाहिरनामा यावर सांगण्यासारखं भरपूर आहे. कोण कुठे गेले त्यावर लोकांना रस नाही. राज्याचा विकास व्हावा. सर्वांगिण विकास करण्याकडे आमचा कल आहे. जागावाटप अंतिम झाल्यानंतर ते जाहीर केले जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
बडोले यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी प्रवेश केला असून यामध्ये हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान अक्षय हिरगुडे, महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज वहाग, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान सागर गरुड, महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश भांडे, मुंबई केसरी पैलवान आबा काळे, पुणे महापौर केसरी पैलवान सोनबा काळे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.