वाद तर होणारच! आधी भाजप प्रवक्त्या आता थेट उच्च न्यायलयाच्या न्यायाधीश; रोहित पवारांनी घेरलं

वाद तर होणारच! आधी भाजप प्रवक्त्या आता थेट उच्च न्यायलयाच्या न्यायाधीश; रोहित पवारांनी घेरलं

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली. यावर आता राजकारण ढवळून निघत आहे. साठे यांच्या नियुक्तीवर विरोधी पक्षांकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी साठे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या या आक्षेपावर भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सार्वजनिक जीवनात आरोप करताना आधी माहिती घ्यावी. उठसूट खोटे आरोप करू नयेत असे ट्विट बन यांनी केले आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?

सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे. याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?

जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही, याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का?

सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना ‘न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असते’ या सामान्य माणसांच्या भावनेलाच आघात बसत आहे. परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा. आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनीही याबाबत मार्गदर्शन करायला हवं, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

रोहित पवारांनी उठसूट खोटे आरोप करू नये : बन

रोहित पवार यांच्या या आक्षेपांना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. बन यांनी पुरावा देत एक ट्विट केलं आहे. रोहित पवारजी सार्वजनिक जीवनात आरोप करताना थोडी माहिती घेऊन आरोप करावा. उठसूट खोटे आरोप करू नयेत. आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 रोजी भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. यासंदर्भातील पत्र भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना दिलं होतं. सोबत हे पत्र जोडत आहे. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार प्रसिद्धीसाठी तुम्ही करू नका, अशी टीका बन यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube