CM फडणवीसांचा इशारा, शिंदेंचा गायकवाडांना फोन; नाराजी व्यक्त करत सुनावले खडेबोल..

Eknath Shinde : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या बाबतीत (Maharashtra Police) वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) देखील गायकवाड यांचं वक्तव्य अतिशय चुकीचं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना (Eknath Shinde) समज द्यावी असे सांगितले होते. यानंतर हालचाली झाल्या. एकनाथ शिंदेंनी आमदार गायकवाड यांना फोन करुन समज दिल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली.
काही पोलिसांनी चुकीचं वर्तन केलं असेल म्हणून सगळ्याच यंत्रणेला दोष देणं योग्य नाही. पोलीस दल शौर्याचं आणि त्यागाचं प्रतिक आहे. पोलीस दल आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. पोलीस सर्वकाही विसरून रात्रंदिवस काम करतात तेव्हा आपण आपले सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्हाला पोलिसांबद्दल जर काही तक्रार असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागू शकता. पण मीडियासमोर जाऊन पोलिसांबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं आहे. लोकप्रतिनिधींच्या तोंडी अशी विधाने शोभत नाहीत. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होते. वर्दीचा मान राखला पाहिजे. येथून पुढे बोलताना काळजी घ्या, अशी समज एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांनी दिली.
जळगाव जिल्हा हादरला… मुलीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून जन्मदात्या पोलीस अधिकारी पित्याने…
काय म्हणाले होते संजय गायकवाड ?
संजय गायकवाड यांच्या मुलाला एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. या विषयावर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की, माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावं लागेल. पोलीस काहीही करु शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही.
त्यामुळं पोलीस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सरकारने जर एखादी कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल. असं आमदार संजय गायकवाड म्हणाले होते.