घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट

घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट

Lok Sabha Elections 2024 : राजकारण म्हटलं की कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकील याचा काहीच अंदाज नसतो. निवडणुकीत तर एकाच घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. आताच्या लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच राजकीय संघर्ष उडाला आहे. कुठे भाऊ विरुद्ध बहीण तर कुठे नणंद विरुद्ध भावजय अशा लढती होताना दिसत आहे.

देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. जागावाटपाच्या चर्चा होऊन उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी घरातील सदस्यांनाच एकमेकांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील 102 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लढतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढती होणार आहेत तर काही ठिकाणी एकच परिवारातील सदस्य आमनेसामने उभे ठाकले आहेत.

मुलाच्या पराभवासाठी बाप मैदानात; केरळमध्ये अनोखे पॉलिटिकल वॉर

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय

महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा देशभरात होत आहे. कारण यावेळी येथील निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. महाविकास आघाडीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच तिकीट दिले आहे. तर महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. याआधी 2019 मधील निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांचा पराभव केला होता.

हिसार मतदारसंघात चौटाला कुंटुंबियात रण

हरियाणातील हिसार मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने येथे ओपी चौटाला यांचे पुत्र रणजीत चौटाला यांना तिकीट दिले आहे. रणजीत अपक्ष आमदार आणि हरियाणा सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाने या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. इंडियन नॅशनल लोकदलाने सुनैना चौटाला यांना संधी दिली आहे. सुनैना या इनेलो पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रधान महासचिव आहेत. भाजप उमेदवार रणजीत चौटाला सुनैना चौटाला यांचे चुलत सासरे आहेत.

जननायक जनता पार्टीने हिसार मतदारसंघात ओमप्रकाश चौटाला यांची आणखी एक सून नैना चौटाला यांना तिकीट देण्याच्या तयारीत आहे. माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या आई नैना चौटाला या आमदार आहेत. 2019 मधील निवडणुकीत स्वतः दुष्यंत चौटाला या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु भाजप उमेदवार ब्रजेंद्र सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. आता ब्रजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिकीटही मिळवले आहे.

‘ते ताकदवान झाले तर देशाचे तुकडे करतील’; मोदींची इंडिया आघाडीवर घणाघाती टीका

आंध्रात बहीण भावाची राजकीय टक्कर

आंध्र प्रदेशातील कडप्पा मतदारसंघात यंदा भाऊ आणि बहिणीत राजकीय संघर्ष होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात वायएसआर काँग्रेसने अविनाश रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे. अविनाश रेड्डी हे वायएस शर्मिला यांचे चुलत भाऊ आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघात अविनाश रेड्डी विजयी झाले होते. त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे आदि नारायणा रेड्डी यांचा पराभव केला होता.

बंगालमध्ये पूर्व पती-पत्नी आमनेसामने

पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर मतदारसंघ खास चर्चेत आहे. येथे भाजपने सौमित्र खान यांना तिकीट दिले आहे. तर तृणमूल काँग्रेसने सौमित्र खान यांच्या पूर्व पत्नी सुजाता मंडल यांना उमेदवारी दिली आहे. सुजाता मंडल आधी भाजपात होत्या. परंतु, त्यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर सौमित्र खान यांनी सुजाता मंडल यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आता निवडणुकीच्या निमित्ताने पूर्व पती पत्नी पुन्हा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube