नगरला वारं फिरलं! आमदारकीसाठी ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी; कुणाचं पारडं जड?

नगरला वारं फिरलं! आमदारकीसाठी ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी; कुणाचं पारडं जड?

Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात ज्या काही (Elections 2024) मोजक्या मतदारसंघांची चर्चा होती. त्यातील एक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या निवडणुकीत महाविकास  आघाडीने बाजी मारली. निवडणुकी आधीच्या फाटाफुटीने राजकीय ताकद कमी झालेली असतानाही शरद पवारांचा करिश्मा चालला. मतदारांनीही साथ दिली अन् निलेश लंके खासदार झाले. यानंतर आता विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. नगर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची संख्या वाढली आहे. आमदारकीचं तिकीट आपल्यालाच मिळावं यासाठी डझनभर इच्छुकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने लोकसभेनंतर लगेच चाहूल लागली ती विधानसभा निवडणुकांची. ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापित नेत्यांसह राजकीय पक्षांना देखील धक्का बसला. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणूक राज्यात गाजली व धक्कादायक निकाल समोर आले. यामुळे आता राजकीय पक्षांकडून देखील विधानसभेसाठी उमेदवारांना तिकीट देताना मोठी चाचपणी केली जाऊ शकते. दरम्यान, इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच नगर शहरातून तर विविध राजकीय पक्षांकडून डझनभर उमेदवार इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत.

Ahmednagar Loksabha चा गड कोण राखणार, विखे की लंके? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज?

राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली. दोन्ही पक्षातील मोठा गट बाहेर पडल्याने दोन पक्षांसह दोन गट देखील निर्माण झाले. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रत्येक पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी देखील मोठी असणार हे नक्की. राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी विरोधात आहे. यामुळे यंदा उमेदवार देखील मोठ्या संख्येने असणार असे चित्र दिसते आहे.

महाविकास आघाडीमधून कोण इच्छुक ?

नगर शहरातून महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसकडून किरण काळे तर ठाकरे गटाकडून भगवान फुलसौंदर, युवासेनेचे विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे यांच्यासह योगीराज गाडे हे देखील आमदारकीसाठी इच्छुकांच्या यादीत आहेत. विशेष म्हणजे नुकतेच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक मातोश्रीवर हजर होते. यावेळी अनेकांनी व्यक्तिगतपणे ठाकरे यांची भेट घेतल्याचे देखील बोलले जात आहे.

व्यक्तिगत भेट ते वरिष्ठांना गळ

विधानसभेसाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले ठाकरे गटाचे विक्रम राठोड यांनी काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांची भेट घेत नगर शहराची जागा ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. तर काँग्रेसचे किरण काळे यांच्या समर्थकांनी तर भावी आमदार म्हणून त्यांचे पोस्टर शहरात लावले होते. काळे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणाहून माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.

Ahmednagar : तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56 कोटींचे अनुदान वर्ग; विखेंची माहिती

महायुतीमध्ये परिस्थिती काय?

नगर शहरातून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे विधानसभेच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट व लोकसभेमध्ये अजित पवार गटाला बसलेला धक्का पाहता नगरच्या जागेवर खुद्द अजित पवार यांचे देखील लक्ष आहे. यामुळे अजित पवार गटाकडून सध्यातरी संग्राम जगताप यांचेच नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महायुती म्हणून पाहिले तर येथेही इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये सचिन जाधव, शिंदे गटाचे अनिल शिंदे,दिलीप सातपुते इच्छुक आहेत. भाजपकडून शहराध्यक्ष अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष भैय्या गंधे व बाबासाहेब वाकळे आदी इच्छुकांच्या यादीत आहे.

एकंदरीतच लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता आघाडीतील घटक पक्षातील इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. दुसरीकडे महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसल्याने याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी महायुतीकडून देखील रणनीती आखली जात आहे. विधासनसभा निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा वेळ बाकी आहे मात्र त्यापूर्वीच नगर शहरात विधानसभेची सुरू असलेली जोरदार तयारी पाहता यंदाची विधानसभा निडवणूक चांगलीच रंगतदार होणार हे मात्र नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज