“फडणवीसांचं उशीरा कौतुक केलं पण..”, आभार मानत भाजप नेत्याचा ठाकरेंना टोला
Chandrashekhar Bawankule : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पालकमंत्री व्हायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर आज शिवसेनेच्या सामना या दैनिकातून चक्क फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं. राजकारणात दुर्मिळ वाटणारी ही घटना आज घडली. यानंतर भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही सामनाचे आभार मानले आहेत.
सामनात नेमकं काय म्हटलं?
गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
देवाभाऊ, अभिनंदन! सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक, काय आहे कारण ?
बावनकुळे काय म्हणाले ?
या लेखावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, आमच्याकडे आज आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसांपासून आम्ही वाटत पाहत होतो की सामनातून कधी चांगलं लिखाण होईल. याआधीच चांगलं लिहीता आलं असतं. आज देवेंद्रजींना विकसित महाराष्ट्र करण्यासाठी गडचिरोली असेल. नक्षलवाद संपवायचा असेल. सामनातून कौतुक होणं हे आमच्यासाठी विकसित महाराष्ट्र घेऊन जात आहे याकरता आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही अनेक निर्णय घेतले आहेत. त्यावेळी सामनातून कौतुक होईल असं वाटलं होतं. पण, ठीक आहे उशिरा केलं यासाठी धन्यवाद.