हलगर्जीपणा भोवला, प्रशासकाच्या हाती कारभार; ‘या’ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त
Solapur News : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जोरदार झटका बसला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेण्यात हलगर्जीपणा केल्याने कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे. या कारखान्यावर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासक नियुक्त करण्याचा हा निर्णय शिवसेना नेत्या रश्मी बागल यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या कारखान्यावर बागल गटाची सत्ता होती. आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोला भाडेतत्वावर देण्याचे रद्द करून सहकारी तत्वावर ठेवण्यात आला होता. याची राज्यभरात चर्चा झाली होती.
मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा
कारखान्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात असतानाचा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता निवडणुका कधी होतील हे सांगता येणे कठीण झाले आहे.
दरम्यान, निवडणूक खर्च भरण्यासाठी 35 लाख रुपये भरण्यास कारखान्यास सांगण्यात आले होते. दहा लाख रुपये भरले गेले. बाकीचे राहिलेले पैसे साखर विक्री करून भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अचानक कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अजित पवारांचं शिंदे सरकारला पत्र
हा कारखाना सुरू करण्यासाठी रश्मी बागल, माजी आमदार नारायण पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले होते. मात्र, आता हा कारखाना प्रशासकाच्या हातात गेला आहे. प्रशासकच आता या कारखान्याचा कारभार पाहणार आहे. त्यामुळे येथील राजकीय नेत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक मानला जात आहे. कारण, या नेत्यांनी कारखाना निवडणुकीची तयारीही केली होती.