Maratha Reservation : सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु अन् मराठा आंदोलक थेट मंचावरच चढले
Supriya Sule : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापल्याचं चित्र दिसून येत आहे. मनोज जरांगे यांची शांतता रॅलीची सांगता नाशिकमध्ये झाल्यानंतर अजूनही मराठा आरक्षणाची धग राज्यभरात कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा सुरु असतानाच मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. लातूरमध्ये आज राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) मंचावर बोलत असतानाच मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी थेट मंचावर चढल्याचे दिसून आले. त्यामुळे सुळे यांना काही काळासाठी आपलं भाषण थांबवावं लागलं होतं.
मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडली. या यात्रेच्या माध्यमातून जरांगे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या मनात आरक्षणाची धग कायम ठेवलीयं. त्याचाच प्रत्यय राष्ट्रवादीच्या आजच्या सभेतून दिसून आलायं. शिवस्वराज्य यात्रेसाठी राष्ट्रवादीचे सर्वच नेते आज लातुरात दाखल झाले. शिवस्वराज यात्रेनंतर जाहीर सभा पार पडली. या सभेत सुप्रिया सुळे जनतेला संबोधित करीत होत्या. याचवेळी मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काही आंदोलक मंचावर चढून सुप्रिया सुळे यांना फक्त आरक्षणाच्या मागणीचं निवेदन द्यायचे आहे, त्यांनी स्विकारुन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले, ठाकरे गटाचा गंभीर आरोप…
यावेळी मंचावरुन बोलताना संतप्त मराठा आंदोलक म्हणाले, आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत फक्त पाठिंबाच दिलायं, आम्ही आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासने दिली आहेत, पण प्रत्यक्षात मराठा आरक्षण समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे आत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलनकांनी थेट माईकद्वारे केलीयं.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतच मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळासाठी कार्यक्रमात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी मराठा आंदोलकांनी तुम्ही ताबडतोब भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी लावून धरल्याचं पाहायला मिळालं. मात्र, काही काळानंतर पोलिस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने गोंधळ शांत झाल्याचं दिसून आलं.
मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा, अशी भूमिका मांडलीयं. त्यामुळे आता शरद पवार यांनी भूमिका मांडल्याने अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कोणतेही पाऊले उचलल्याचं दिसून येत नाही. पुढील काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी राजकीय पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल…
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने राष्ट्रवादीला मते दिली आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत आणि मराठ्यांना ओबीसीतून 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षण देण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तरच आम्ही तुमच्यासोबत राहू अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिलायं.