Bachchu Kadu : भविष्यात भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!

Bachchu Kadu : भविष्यात भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!

Bachchu Kadu : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर त्यांना मराठा समाजातून विरोध केला जात आहे. काल नाशिक दौऱ्यावर असतानाही त्यांना ठिकठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला. या घडामोडींवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात असे सूचक वक्तव्य कडू यांनी केले.

कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भुजबळांना होत असलेल्या विरोधाबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर कडू म्हणाले, छगन भुजबळांचं नेतृत्व अतिशय चांगलं आणि दमदार आहे. फक्त त्यांचा पवित्रा थोडा चुकला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसह मराठा, ओबीसी, एससी, एसटींचं नेतृत्व करावं. मराठा आणि ओबीसी हे काही शत्रू नाहीत. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर ते दमदार नेतृत्व आहे. या पद्धतीने जर त्यांनी भूमिका घेतली तर भविष्यात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होऊ शकतात.

Bachchu Kadu : जवळच्याच माणसाने पंकजा मुंडेंचा घात केला; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ काल  (Chhagan Bhujbal) नाशिकच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केला. सातबारा आमचा त्यामुळे आमच्या बांधावर येऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. तसेच काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला ग्रामस्थांनी काळे झेंडेही दाखवले. त्यानंतर छगन भुजबळ यांचा ताफा जात असलेल्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं. तसेच भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून भुजबळांच्या वाहनांचा ताफा गेला त्या रस्त्यावर आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं.

दरम्यान, या घडामोडींत आता छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मागणी केली होती. त्यावर भुजबळांनी त्यांना स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले. राधाकृष्ण विखे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझा राजीनामा हवा असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांना तसं सांगावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणतीही तंबी देण्यात आली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube