“महिला अधिकारी दमदाटी प्रकरण आमच्यासाठी संपलं, अजितदादांनी..”, परांजपे यांनी विरोधकांना सुनावलं

Mumbai News : राज्यात अजित पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलं माहीत आहे. त्यामुळेच उबाठा गटाच्या शरद कोळी नामक नेत्याने टीका करण्याअगोदर रात्री सोलापूरहून सिध्देश्वर एक्स्प्रेस ट्रेन पकडून मातोश्री गाठावी आणि मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना अर्थखातं का दिले असा जाब विचारावा. कोविड काळात राज्याची आर्थिक घडी कुठेही बिघडू न देता अत्यंत उत्तमपणे अर्थ खातं सांभाळलं अशी स्तुती उद्धव ठाकरेंनी केली होती याचाही जाब विचारावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला.
सोलापूर प्रकरण आता संपलं
अजित पवारांनी आपली सोलापूरच्या प्रकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत. मात्र आमच्या दृष्टीने सोलापूर हा विषय संपलेला आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
या प्रकरणात अजित पवार यांनी फेसबुक पोस्ट व ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. सोलापूरमध्ये कायदेशीर कारवाईवर बाधा यावी अशा प्रकारे फोन केला नाही किंबहुना तिथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तिथे हस्तक्षेप केला होता. अजित पवारांनी महिला पोलिस दलातील सर्वच महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचे राज्य असले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपले ट्विट डिलीट केले आहे आता या विषयावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस बोलू इच्छित नाही.
तो निर्णय ठाकरे बंधुंनीच घ्यावा
दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील यावर बोलताना दोघांचेही राजकीय पक्ष आहेत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आहेत तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आहेत. एकत्र येण्याचा हा निर्णय या दोघांनी घ्यायचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता ही महायुतीबरोबर आहे असा विश्वास परांजपे यांनी व्यक्त केला.
लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले त्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोगावर विरोधकांनी ताशेरे ओढले नाहीत. मात्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते आता प्रश्न उपस्थित करत आहेत.विधानसभेतील दारुण पराभवानंतरदेखील विरोधक त्या नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला आहे.
रोहित पवारांच्या प्रश्नावर उत्तर दिलेच पाहिजे असे नाही
रोहित पवारांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिलेच पाहिजे असे काही नाही. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित व अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पुण्यामध्ये जी घटना घडली याबाबतची चौकशी होईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई देखील होईल. महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि त्यामुळे एखादी घटना होऊ नये याचा प्रयत्नदेखील गृहखात्याकडून असतो त्यामुळे जर एखादी घटना घडली तर त्याबाबत कठोर कारवाई पोलीस करत असतात.
मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळणार नाही; कुणबी नोंदींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठ वक्तव्य