Rohit Pawar : “राज ठाकरेंचं आम्ही स्वागतच करू”; रोहित पवारांनी थेट ऑफरच दिली

Rohit Pawar : “राज ठाकरेंचं आम्ही स्वागतच करू”; रोहित पवारांनी थेट ऑफरच दिली

Rohit Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. युती आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून नवे मित्र जोडण्याच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यातच काल मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची बातमी आली. सहाजिकच मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या. इकडे नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ मनसेसाठी सोडण्याची तयारी शिंदे गट आणि  भाजपकडून सुरू आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठे वक्तव्य करत थेट राज ठाकरेंना (Raj Thackeray) ऑफर दिली आहे. राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले.

आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो.. शिवसेनेच्या निकालावर देवेंद्र फडणवीस थेट बोलले

रोहित पवार म्हणाले, संविधान टिकवण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर येण्याचे मान्य केले आहे. तसेच जर राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर सर्वच पक्षांना ते मान्य असेल आणि आम्ही त्यांचे स्वागत करू. राज ठाकरे यांची भूमिका आम्हाला पटते. त्यांचे ट्विट पाहिले तर ते नेहमीच भाजपाच्या विरोधात असतात. जनतेच्या बाजूने ते उभे राहिलेले दिसतात. अशा परिस्थितीत राजसाहेब ठाकरे आपली भूमिका बदलतात का, महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवतात का हे पहावे लागेल. ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जनतेबरोबर राहिले तर आम्ही कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून त्यांचे नक्कीच स्वागत करू, असे रोहित पवार म्हणाले.

शिर्डी मनसेला सोडणार?

मनसेला महायुतीत कसे सहभागी करून घ्यायचे याचा खल सध्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू आहे. मनसेशी अधिकृत युती करायला भाजपचा ठाम नकार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांची साथ आवश्यक वाटते. त्यातूनच मग शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेकडे देण्यासाठीची खलबते सुरू आहेत. या मतदारसंघात मग महायुतीचा अधिकृत उमेदवार रिंगणात ठेवायचा नाही, अशी ही रणनीती आहे. त्याऐवजी भाजप- शिंदे गटाने मनसेला पाठिंबा द्यायचा, असे सारे गणित आहे. मग या मतदारसंघात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी अशी मग लढत होऊ शकेल.

Raj Thackeray : तेव्हा बांधकामासाठी टेंडर नव्हते; बाबरीची वीट मिळाल्यानंतर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

मनसेकडून या मतदारसंघासाठी बाळ नांदगावकर यांचे नाव आघाडीवर आहे. राज यांचे निष्ठावान सैनिक म्हणून नांदगावकर यांची राज्यभर ओळख आहे. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव त्यांनी केला होता. त्यामुळे जायंट किलर म्हणूनही त्यांची ख्याती आहे. भाजप-शिवसेना युतीत गृहराज्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती. नांदगावकरांच्या रूपाने मनसेला पहिला खासदार मिळू शकतो, अशी आशा मनसैनिकांना आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube