Ajit Pawar : ..म्हणून मलाच टार्गेट केलं गेलं; ‘त्या’ आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच नावं दिली होती. अहवाल आला मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला मंत्रिमंडळात मान्यता दिली नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर कर्जत खालापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे खासदार सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित यंदा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. नवीन सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी व्हावेत ही आपल्या सगळ्यांची धारणा आहे. त्यासाठी राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या ज्या चार जागा आहेत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणारच आहोत. यासह इतर काही जागा उबाठाच्या जिथं ताकद जास्त जागा आहेत तिथं चर्चा करून जागावाटप करू. प्राथमिक चर्चा झाली होती. पण, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे या काळात काही बातम्या आल्या तरी त्यावर विश्वास ठेऊ नका, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन
2012 मध्ये राज्य लोडशेडिंग मुक्त केलं
आज मी 32 वर्षे मंत्रिमंडळात काम करत आहे. मी 10 वर्षे ऊर्जा खात्याचा मंत्री होतो. भारनियमनातून राज्याला मुक्त केलं होतं. आम्ही वचन पाळतो. अर्थ विभागही माझ्याकडे आहे. सहा लाख कोटींचं बजेट माझ्याकडे असते. डीपीसीच्याबाबतीत माझ्यावर कुणीही आरोप करू शकत नाही. जीएसटी विभाग माझ्याकडे आहे. प्रचंड कर संकलन या विभागात होतं. माझी नेहमीच स्पष्ट भूमिका असते. काम व्हावं हा माझा हेतू असतो. कार्यकर्त्यांचीही तीच भावना असते, असे अजित पवार म्हणाले.
शरद पवारांच्या खासदारांना थेट आव्हान
अजित पवार यांनी आपल्या भाषणात ज्या चार जागा लढविण्याचे सांगितले त्यातील तीन मतदारसंघात शरद पवार गटाचे खासदार आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आणि सातारा मतदारसंघात श्रीनिवास पाटील खासदार आहेत. आता या जागा लढविण्याचे अजितदादांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार असल्याचे दिसत आहे.
Supriya Sule : ‘शरद पवारांना अंधारात ठेऊन शपथ घेता मग कारवाई’.. सुळेंचा अजित पवार गटाला फटकारलं