Lok Sabha Election : ‘ओबीसी बहुजन पार्टी’ही लोकसभेच्या रिंगणात; सर्व मतदारसंघात देणार उमेदवार
Lok Sabha Election : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच ओबीसी आरक्षणानेही (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन आता एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढणार (Lok Sabha Election) आहेत, अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली. या पक्षाचा झेंडा पिवळ्या रंगाचा आहे आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ निवडणूक असेल. बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आमचा पक्ष राज्यातील सर्व 48 मतदारसंघात उमेदवार देणार आहे. 10 ते 12 जागांवर उमेदवारांची नावेही अंतिम झाली आहेत, असे शेंडगे म्हणाले.
Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी
ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रेरणेने या पक्षाची स्थापना झाल्याचे सांगितले जात आहे. या पक्षाच्या स्थापनेच्या प्रक्रियेत भुजबळ कुठेही नसले तर आगामी काळात भुजबळ सोबत येतील असे ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल.
या राजकारणात आता आणखी एका नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. ओबीसी बहुजन पार्टी सगळ्याच मतदारसंघात उमेदवार देणार आहे. त्यानुसार नेत्यांनी तयारीही चालवली आहे. जर या पक्षाने खरंच सर्व 48 मतदारसंघात उमेदवार दिले तर सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. आगामी राजकारण कसे राहिल यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. सध्या तरी पक्ष नेत्यांनी सर्व मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यानंतर पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.